मेहकर चेक पोस्टनजीक तीन हजार प्रवाशांची चाचणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:43 AM2021-05-07T04:43:49+5:302021-05-07T04:43:49+5:30
रिसोड : लवकर निदान व उपचार व्हावेत याकरीता चेकपोस्टवरदेखील कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. ...
रिसोड : लवकर निदान व उपचार व्हावेत याकरीता चेकपोस्टवरदेखील कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. त्यानुसार रिसोड शहरानजीक असलेल्या मेहकर चेकपोस्ट येथे गत १३ दिवसात तीन हजार प्रवाशांची चाचणी करण्यात आली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ब्रेक द चेन मोहिमेंतर्गत नवीन नियमावलीची अंमलबजावणी केली जात आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांसह पालिका प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहनही करीत आहे. मात्र, नागरिक काहीच देणे-घेणे नसल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे वर्दळ दिसून येते. त्यातून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणीदेखील कोरोना चाचणी केली जात आहे. याशिवाय चेकपोस्ट येथेही कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी म्हणून मेहकर चेकपोस्ट येथे कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या चेकपोस्टवर शिक्षक, आरोग्यसेविका व पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली. मेहकर व लोणार या भागातून येणाऱ्या प्रवाशांची या चेकपोस्टवर तपासणी व चाचणी केली जाते. या ठिकाणी लोणार येथील पथक कार्यान्वित आहे दररोज सरासरी २५० नागरिकांची तपासणी होत आहे तसेच वाहनांची तपासणी, ई-पासची तपासणीदेखील केली जात आहे. ई-पास नसल्यास संबंधित प्रवाशांना परत पाठविण्यात येते. तसेच जिल्ह्यातील प्रवाशांना ई-पास नसल्यास परजिल्ह्यात जाऊ दिले जात नाही.