मुलीच्या नावे तीन हजार रुपये १८ वर्षांसाठी ‘फिक्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:49+5:302021-06-10T04:27:49+5:30
मानोरा : मानोरा तालुक्यातील कारखेडा ग्रामपंचायतीने जाहीर केल्यानुसार स्त्रीजन्माचे अनोख्या पद्धतीने ९ जून रोजी स्वागत करण्यात आले. ९ जून ...
मानोरा : मानोरा तालुक्यातील कारखेडा ग्रामपंचायतीने जाहीर केल्यानुसार स्त्रीजन्माचे अनोख्या पद्धतीने ९ जून रोजी स्वागत करण्यात आले. ९ जून रोजी जन्मलेल्या दोन मुलींच्या नावे प्रत्येकी तीन हजार रुपये अठरा वर्षांसाठी ‘फिक्स’ टाकण्यात आले.
कारखेडा गावच्या सरपंच सोनाली बबनराव सोळंके यांनी सरपंचपदाची सूत्रे स्वीकारताच विविध घोषणा केल्या. पुरुषाच्या तुलनेने मुलीचा जन्मदर कमी आहे. स्त्रीजन्मदराचे प्रमाण वाढविण्यासाठी कारखेडा येथे अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुलगी जन्मताच एक हजार रुपये १८ वर्षांसाठी फिक्स टाकण्यात येणार असल्याची घोषणा सरपंच सोळंके यांनी केली होती. या घोषणेला प्रतिसाद मिळाला. के.एल. देशमुख विद्यालयाचे प्रा. अभिजित कदम व सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बाबुराव सोळंके यांनी पाच मुलींपर्यंत प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची घोषणा केल्याने प्रत्येक मुलीच्या नावे तीन हजार रुपये पोस्टामध्ये सुकन्या योजनेंतर्गत टाकण्यात आले. पहिल्या जन्म घेतलेल्या नेहा सुचिता कुंदन जाधव व दुसऱ्या जन्म घेतलेल्या वैदवी प्रतीक्षा आकाश ढवळे या मुलीच्या मातापित्याचा शाल, श्रीफळ देऊन तीन हजार रुपयांचे धनादेश पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय भगत व विजय खिल्लारे यांच्या हस्ते देण्यात आले. त्याआधी महिलांना विमा सुरक्षाकवचाचेसुद्धा वितरण करण्यात आले. संचालन ग्रामसेवक अनिल सूर्य यांनी, तर प्रास्ताविक पोलीस पाटील वासुदेव सोनोने यांनी, तर आभार शिक्षक रणजित जाधव यांनी मानले. यावेळी उपसरपंच अनिल सीताराम काजळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मीना विनोद ढोके, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य वर्षा देशमुख, चैताली परांडे, प्रमिला चव्हाण, गणेश जाधव, बाळू जाधव, मनोज तायडे, वैभव कांबळे, बचत गट प्रतिनिधी माधुरी कांबळे, पुष्पा चव्हाण, नीला ढोले, ज्योत्स्ना देशमुख, वैभव कांबळे, जगदीश परांडे, प्रमोद ढवळे आदींची उपस्थिती होती.