तीनवेळा मुदतवाढ मिळूनही विसावी पशुगणना अपूर्णच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:16 PM2019-06-18T17:16:23+5:302019-06-18T17:16:46+5:30

प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यानंतर ३१ मार्च २०१९, ३० एप्रिल २०१९ आणि १० जून २०१९ अशी तीनवेळा मुदतवाढ देण्यात येवूनही प्रक्रिया अद्याप अपूर्णच आहे.

 Three-time extension of time is not enough to livestock census | तीनवेळा मुदतवाढ मिळूनही विसावी पशुगणना अपूर्णच!

तीनवेळा मुदतवाढ मिळूनही विसावी पशुगणना अपूर्णच!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आॅक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आलेली विसावी पशुगणना प्रक्रिया पूर्ण करण्यास डिसेंबर २०१८ ची मुदत देण्यात आली होती; मात्र सुरूवातीच्याच टप्प्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणेस प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यानंतर ३१ मार्च २०१९, ३० एप्रिल २०१९ आणि १० जून २०१९ अशी तीनवेळा मुदतवाढ देण्यात येवूनही प्रक्रिया अद्याप अपूर्णच आहे. दिल्लीतील मुख्य सर्व्हर आणि प्रगणकांना दिलेल्या टॅबमध्ये उद्भवणारे तांत्रीक बिघाड, टॅबमधील अनेकवेळा बदललेले वर्जन या कारणांमुळेच हा प्रकार घडल्याची माहिती प्राप्त झाली.
महाराष्ट्रात सन २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली होती. त्यापुढील पाच वर्षानंतर अर्थात २०१७ मध्ये विसाव्या पशुगणनेचे काम सुरू होणे क्रमप्राप्त होते. प्रत्यक्षात मात्र हे काम आॅक्टोबर २०१८ मध्ये हाती घेण्यात आले. बदललेल्या कार्यप्रणालीनुसार पशुगणना करण्यासाठी राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये प्रगणकांची नियुक्ती करून त्यांना ‘टॅब’ पुरविण्यात आले. त्यात आधी २.० वर्जन टाकण्यात आले. यामाध्यमातून पशुपालकांच्या घरी जावून त्यांच्याकडील जनावरांची माहिती आॅनलाईन, आॅफलाईन पद्धतीने आधी ‘टॅब’मध्ये आणि नंतर दिल्लीतील मुख्य सर्व्हरकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या; मात्र २.० हे वर्जन प्रगणकांसाठी त्रासदायक ठरू लागल्याने त्यात बदल करून ३.० चे वर्जन टॅबमध्ये टाकण्यात आले. त्याऊपरही पशुगणनेच्या कामाला गती मिळाली नाही. दरम्यान, निर्धारित मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्याने केंद्रशासनाने तीनवेळा मुदतवाढ दिली; मात्र १० जून २०१९ या अंतीम मुदतीपर्यंतही पशुगणनेचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

आकडेवारीबाबत पशुसंवर्धन विभाग अनभिज्ञ
आॅक्टोबर २०१८ पासून सुरू झालेली पशुगणना ९ महिन्याच्या मोठ्या कालावधीतही पूर्ण होवू शकलेली नाही. प्रगणकांनी गोळा केलेली माहिती मुख्य सर्व्हरकडे पाठविली; मात्र त्यात विविध स्वरूपातील त्रुटी असून ही प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. यामुळे राज्यातील जिल्ह्यांमध्ये नेमकी किती जनावरे आहेत, याबाबत पशुसंवर्धन विभागच अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
 
 
पशुगणना करण्यासाठी नेमलेल्या प्रगणकांच्या माध्यमातून पशुपालकांकडील जनावरांची माहिती गोळा करून वरिष्ठ स्तरावर पाठविली आहे; मात्र प्रक्रिया पूर्ण होवून नेमकी आकडेवारी हाती यायला आणखी विलंब लागणार आहे.
- भुवनेश बोरकर
जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त, वाशिम

Web Title:  Three-time extension of time is not enough to livestock census

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम