तीन वर्षांच्या चिमुकल्यास घरी सोडून पोटापाण्यासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 12:06 PM2020-10-14T12:06:30+5:302020-10-14T12:06:45+5:30
Washim News हनवतखेडा येथील मनोहर आणि वर्षा वाघमारे या दाम्पत्याच्या जिवनाचे हे विदारक वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कुटूंबाचा गाडा चालावा, पोटाची खळगी भरावी म्हणून अवघ्या शंभर रुपये मजुरीसाठी मातापित्यांना तीन वर्षांच्या चिमुकल्यास दिवसभर घरी ठेवून कामाला जावे लागते. मालेगाव तालुक्यातील हनवतखेडा येथील मनोहर आणि वर्षा वाघमारे या दाम्पत्याच्या जिवनाचे हे विदारक वास्तव आहे.
जिल्ह्यातील मालेगाव तालुका हा आदिवासी बहुल आहे. या तालुक्यात रोजगाराची समस्या गंभीर आहे. उद्योगधंदे, तर सोडाच; पण खरीप हंगामानंतर शेतीची कामेही मिळणे कठीण असते. त्यामुळे काही महिला, पुरुष बिबे फोडण्याचे काम करून कुटूंबाचे उदरभरण करतात. त्यात हनवतखेडा येथील बहुतांश कुटूंबाचा समावेश आहे. यामध्ये मनोहर नामदेव वाघमारे आणि वर्षा मनोहर वाघमारे या पती, पत्नीचा समावेश आहे. या दाम्पत्यांना प्रतिक (३ वर्षे) आणि संघर्ष (७ महिने) अशी दोन अपत्ये आहेत. बिबे फोडण्याचे काम घातक आहे आणि दुसरा रोजगार नाही. मुलास सोबत नेल्यास त्याला बिब्याच्या उडणाऱ्या तेलापासून धोका आहे.
एकाने घरी राहिले, तर पोट भरणे कठीण, अशी समस्या त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे त्यांना ३ वर्षाच्या प्रतिकला दिवसभर घरी सोडून प्रत्येकी शंभर रुपये मजुरीने बिबे फोडण्याच्या कामाला जावे लागते. तेव्हा, ३ वर्षाच्या प्रतिक संपूर्ण दिवस घराच्या बंद दरवाजासमोर बसून मातापित्याची प्रतिक्षा करीत असल्याचे विदारक चित्र हनवतखेड्यात पाहायला मिळते.
७ महिन्यांच्या बाळासाठी झाडाला पाळणा
बिबे फोडण्याचे काम करीत असताना ७ महिन्याचे बाळ वागविणे कठीण असते आणि सांभाळण्यास कोणी नसल्याने त्याला घरी सोडणेही अशक्य असते. त्यामुळे वर्षा आणि मनोहर वाघमारे, हे पती-पत्नी त्यांच्या ७ महिन्यांच्या संघर्ष नावाच्या चिमुकल्यास कामाच्या ठिकाणी असलेल्या झाडाला पाळणा बांधून झोपी घालत आपले काम करतात.
आमच्या गावात रोजगाराची समस्या गंभीर असल्याने आम्हाला बिबे फोडण्याचे काम करावे लागते. एकट्याने भागत नाही आणि बिब्याच्या घातकतेमुळे चिमुकल्या प्रतिकला सोबत नेता येत नाही.
-मनोहर वाघमारे,
रहिवासी, हनवतखेडा