मिटींगच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या तीन शाळा कुलूपबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 09:50 AM2019-08-22T09:50:55+5:302019-08-22T09:51:18+5:30
विळेगाव, भिलडोंगर व गोवर्धन नगर येथील जिल्हा परिषद शाळा दुपारी ११.२० ते १२ या वेळेत कुलूपबंद आढळून आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.
- बबन देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : मिटींगच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या तीन शाळा कुलूपबंद असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने २१ आॅगस्ट रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये कैद झाला. मानोरा तालुक्यातील गिरोली केंद्रातील विळेगाव, भिलडोंगर व गोवर्धन नगर येथील जिल्हा परिषद शाळा दुपारी ११.२० ते १२ या वेळेत कुलूपबंद आढळून आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषद शाळांची स्थापना करण्यात आली आहे. काही शाळा यशाची एकेक पायरी गाठत आहेत तर काही शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मात्र झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येते. मानोरा तालु्क्यातील काही दोन शिक्षकी शाळा मिटींगच्या दिवशी कुलूपबंद राहतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी २१ आॅगस्ट रोजी सकाळी ११.२० ते १२ वाजेदरम्यान गिरोली केंद्रातील भिलडोंगर, गोवर्धन नगर, विळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप आढळून आले. अधिक चौकशी केली असता, दोन शिक्षकी शाळा असल्याने आणि २१ आॅगस्ट रोजी दोन ठिकाणी मिटींग असल्याने दोन्ही शिक्षक त्या मिटींगला हजर राहण्याचे गेल्याचे सांगण्यात आले. एकाच दिवशी दोन मिटींगचे आयोजन करण्यामागे शिक्षण विभागाचा काय हेतू असावा याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. प्रभारी गटशिक्षणाधिकारी लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.
मिटींगच्या नावाखाली शाळा कुलूपबंद ठेवणे हा गंभीर प्रकार आहे. याची दखल घेतली असून, मानोरा गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागविण्यात आला. दोषींविरूद्ध निश्चित कारवाई केली जाईल.
- दीपक कुमार मीना,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
शाळेवर २ शिक्षक कार्यरत आहेत. २१ आॅगस्ट रोजी जगदंबा नगर येथे टॅग मिटिंग होती. त्यामुळे एक शिक्षक तेथे गेले तर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची सभा मानोरा येथे होती. त्या सभेला मी हजर होता.
- अभिजीत लाड,
मुख्याध्यापक जि.प. शाळा
गोवर्धन नगर ता. मानोरा