जि.प.च्या तीन, पं.स.च्या पाच जागा झाल्या रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:39 AM2021-03-08T04:39:27+5:302021-03-08T04:39:27+5:30
रिसोड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे कवठा, गोभणी, भर जहागीर या तीन जिल्हा परिषद सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. माजी खासदार ...
रिसोड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे कवठा, गोभणी, भर जहागीर या तीन जिल्हा परिषद सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या गटाचे स्वप्निल सरनाईक हे कवठा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते, तर गोभणी जिल्हा परिषद गटातून पुजा अमोल भुतेकर विजयी झाल्या होत्या. भर जहागीर सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून उषा गरकळ मोजक्याच मतांनी विजयी झाल्या होत्या. आता याच तीन जागांसाठी पुन्हा निवडणूक होणार असल्याची चर्चा रिसोड तालुक्यात सुरू आहे. गतवेळच्या निवडणुकीत पराजित झालेल्या उमेदवारांचे या योगे पुन्हा निवडणुकीत उभे राहून विजयी होण्याचे मनसुबे वाढले आहेत.
रिसोड पंचायत समितीच्या विद्यमान सभापती गीता संजय हरिमकर यांचे पददेखिल रिक्त झाले असून माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या गटाला चांगलाच हादरा बसला आहे. कवठा जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गणातील दोन्ही सदस्य माजी खासदार देशमुख यांच्या गटाचे आहेत. यासोबतच हराळ पंचायत समिती सदस्य विष्णुपंत खाडे यांनी भाजपाला रामराम करून माजी खासदार देशमुख यांच्या गटात प्रवेश केला होता. वाकद पंचायत समिती गणातून द्वारकाबाई अशोक कुलाळ, तर महागाव गणातून राहुल बोडखे हे आमदार अमित झनक यांच्या गटाचे उमेदवार विजय झाले होते. या दोन्ही गणातून निवडणुका ओबीसी प्रवर्गातून झाल्यामुळे दोन्ही पंचायत समिती सदस्यपदे रिक्त झाली आहेत. यामध्ये माजी खासदार देशमुख गटाकडून विजयी झालेल्या वाकद पंचायत समिती सदस्य द्वारकाबाई कुलाळ वाटाघाटींमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये सभापतिपदी विराजमान होणार होत्या; मात्र त्यांची जागा रिक्त झाल्यामुळे सभापतिपदाच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. भर जहागीर, मोप पंचायत समिती गणातून आमदार झनक यांच्या गटाच्या मीना नरवाडे विजयी झाल्या होत्या; मात्र त्यांनाही आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. या राजकीय घडामोडींची तालुक्यात चांगलीच चर्चा होत आहे.