वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने पेटवून दिली ज्वारीची सुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 01:54 PM2019-11-11T13:54:28+5:302019-11-11T13:54:48+5:30
वाईगौळ येथील शेतकरी हरीचंद भासू राठोड यांनी यंदा ९ एकर शेतात ज्वारी पेरली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतातील उभ्या व ठेवून असलेल्या पिकांची प्रचंड नासधूस केली जात आहे. या त्रासाला कंटाळून तालुक्यातील वाईगौळ येथील एका शेतकºयाने शेतात रचून ठेवलेली ज्वारीची सुडीच पेटवून दिल्याचा प्रकार ११ नोव्हेंबरला घडला. प्रशासनाच्या वेळगाढू धोरणाचाही यावेळी शेतकºयाने निषेध नोंदविला.
प्राप्त माहितीनुसार, वाईगौळ येथील शेतकरी हरीचंद भासू राठोड यांनी यंदा ९ एकर शेतात ज्वारी पेरली होती. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यातील ८० टक्के ज्वारीची हानी झाली. उरलीसुरली २० टक्के ज्वारी काढून त्याची सुडी रचून ठेवण्यात आली होती. त्याचे वन्यप्राण्यांकडून नुकसान झाले. यामुळे अखेर कंटाळलेल्या शेतकरी राठोड यांनी संतापाच्या भरात सुडी पेटवून देत रोष व्यक्त केला. दरम्यान, आतातरी प्रशासकीय यंत्रणेने शेतात येऊन नुकसानाची पाहणी करावी व भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही शेतकरी राठोड यांनी केली.