हिवाळ्यातच तलावांनी गाठला तळ!
By admin | Published: December 5, 2015 09:09 AM2015-12-05T09:09:14+5:302015-12-05T09:09:14+5:30
रिसोड तालुक्यात सरासरी १५ टक्के जलसाठा.
रिसोड (जि. वाशिम): यावर्षीच्या अल्प पावसाने प्रकल्पांतील जलसाठय़ांची स्थिती भयावह केली. तालुक्यातील तलावांनी हिवाळ्यातच तळ गाठला असून, सरासरी १५.२९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात अल्प पाऊस पडत आहे. परिणामी हिवाळ्यातच नदी-नाल्यांसह पाण्याचे बहुतांश जलाशये कोरडेठण्ण पडत आहेत. जलपातळी खालावत असल्याने आणि जलाशयांमध्ये अ त्यल्प जलसाठा असल्याने रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. रिसोड तालुक्यात नेतंसा, बोरखेडी, कोयाळी, धोडप, गणेशपूर, गौंढाळा, जवळा, करडा, मांडवा, मोरगव्हाण, पाचंबा, वाघी, हराळ व कोयाळी असे एकूण १४ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी १५.२९ टक्के जलसाठा आहे. नेतंसा २१.५१, बोरखेडी १५.९५, कोयाळी ७.३२, धोडप ८.४८, गणेशपुर ५३.२५, गौंढाळा ५.३७, जवळा ३३.९४, करडा १३.१३, मांडवा ३0.६६, मोरगव्हाण १२.७२, पाचंबा १३.४ आणि वाघी ८.४६ असा प्रकल्पातील जलसाठा आहे, तर हराळ व कोयाळी या प्रकल्पात शून्य जलसाठा आहे. पाणीपुरवठा योजना थकीत वीजबिलापोटी बंद पडल्या आहेत. ग्रामस्थांना पाणीटंचाईशी सामना करण्याची वेळ आली आहे.