कोरोनाचे निर्बंध कठोर करा; पण ‘लॉकडाऊन’ नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:38 AM2021-03-28T04:38:56+5:302021-03-28T04:38:56+5:30

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालले आहे. दैनंदिन आढळणाऱ्या पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ ...

Tighten corona restrictions; But don't lockdown! | कोरोनाचे निर्बंध कठोर करा; पण ‘लॉकडाऊन’ नको!

कोरोनाचे निर्बंध कठोर करा; पण ‘लॉकडाऊन’ नको!

Next

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालले आहे. दैनंदिन आढळणाऱ्या पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा ‘लॉकडाऊन’ लावण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे; मात्र यामुळे काहीच साध्य होणार नाही. उलट कसेबसे रुळावर आलेले व्यवसाय पुन्हा ठप्प होऊन उपासमार ओढवेल. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध अधिक कठोर करा; पण ‘लॉकडाऊन’ लावूच नका, असे स्पष्ट मत हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य व्यावसायिकांनी व्यक्त केले.

वाशिम जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर हळूहळू कोरोना संसर्गाने संपूर्ण जिल्हा कवेत घेतला. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासनाच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाने ‘लॉकडाऊन’ लावला. यामुळे सर्वच प्रकारचे व्यवसाय बंद झाल्याने आस्थापना मालकांसोबतच तेथील कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली. रस्त्यांवर फिरून भाजीपाला, फळे, खरमुरे, हारफुले, खेळणी, कटलरी सामान विक्री करणाऱ्या छोटे व्यावसायिकही ‘लॉकडाऊन’ काळात अक्षरश: देशोधडीला लागले. कोरोना रुग्णांचा ‘ग्राफ’ मात्र या काळातही विशेष कमी झाला नाही. आता तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाने बाधित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात फुगला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता पुन्हा ‘लॉकडाऊन’ लावण्याचे सुतोवाच शासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर कपडा विक्रेते, ज्वेलर्स, हार्डवेअर दुकानदार, भाजी व फळविक्रेते, थंडपेय विक्रेते, रसवंती चालक, चप्पल विक्रेत्यांसह अन्य सर्वसामान्य व्यावसायिकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता ‘लॉकडाऊन’ने पूर्वीही फारसे काही साध्य झाले नाही आणि आताही ‘लॉकडाऊन’मुळे विशेष असा कुठलाच फायदा होणार नाही. याउलट आधीच अडचणीत सापडलेले व्यवसाय पूर्णत: ठप्प होतील. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ नकोच. त्याऐवजी कोरोनाविषयक निर्बंध अधिक कठोर करा, असा सूर उमटला.

.......................

गतवर्षी लावलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे सराफा व्यवसायाला मोठा फटका बसला. पुढील दोन वर्षे भरून न निघणारे नुकसान यामुळे झाले. आता पुन्हा तशी परिस्थिती उद्भवल्यास सुवर्णकारांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही. शासनाने ‘लॉकडाऊन’ लावूच नये.

- सुभाष उकळकर, सराफा व्यावसायिक

.........................

गतवर्षी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लावण्यात आला. बरेच दिवस व्यवसाय पूर्णत: बंद राहिल्याने उपासमारीची वेळ ओढवली होती. त्यामुळे आता ‘लॉकडाऊन’ लावूच नये. त्यापेक्षा नियम अधिक कठोर करायला हवे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हायला हवी.

- रामा इंगळे, फुलविक्रेता

.................

सायंकाळी पाचनंतर बाजारपेठ बंद होते. त्यामुळे कडक उन्हात बसून अंगाची लाहीलाही होत असतानाही पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय करावा लागतो. ‘लॉकडाऊन’ लागल्यास उपासमार ओढवणार आहे. मायबाप शासनाने याचा विचार करायला हवा.

- लताबाई हिवाळे, चिंच-निंबू विक्रेता

.............

वाशिममध्ये कुठलेही मोठे उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे विकेल ते साहित्य घेऊन मी बाजारात बसतो. रविवारची होळी असल्याने त्यासाठी लागणाऱ्या साखरगाठ्यांच्या विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. ‘लॉकडाऊन’ लागल्यास व्यवसाय ठप्प होऊन बेरोजगार व्हावे लागणार आहे.

- कृष्णा नेमाडे, गाठी विक्रेता

...........

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ‘लॉकडाऊन’ लावून बाजारपेठ पूर्णत: बंद न करता सकाळपासून दुपारी किमान दोन वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. यामुळे व्यवसाय करता येईल आणि उद्देशही सफल होईल.

- शुभम उचाडे, माठ विक्रेता

...................

गतवर्षी ‘लॉकडाऊन’ लावण्यात आला होता. त्यामुळे तब्बल ४२ दिवस घरीच बसावे लागले. व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला होता. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर बसून चप्पल विक्री करित असून घरखर्च भागविणे शक्य होत आहे. पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागल्यास उपासमार ओढवेल. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ लावू नये.

- तुळशीराम धाडवे, चप्पल विक्रेता

.............

घरी दोन माणसे आजारी आहेत. यामुळे नाईलाजाने मला रस्त्याच्या कडेला थाटलेल्या दुकानात बसून व्यवसाय करावा लागत आहे. मागीलवर्षी ‘लॉकडाऊन’मुळे आर्थिक परिस्थिती पार बिघडली होती. तशी अवस्था आता व्हायला नको. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ नकोच.

- चंद्रकला घुगे, किरकोळ साहित्य विक्रेता

............

कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे खरेच शक्य असेल तर निश्चितपणे प्रशासनाने पुन्हा ‘लॉकडाऊन’ लावण्यास हरकत नाही; मात्र यामुळे काही साध्य होईल असे वाटत नाही. त्याऐवजी कोरोनाविषयक नियम अधिक कठोर करून नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचे सत्र अवलंबावे.

- संजय गुंडेकर, भाजीविक्रेता

Web Title: Tighten corona restrictions; But don't lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.