पुलाअभावी शेतक-यांवर शेतमाल शेतात ठेवण्याची वेळ
By admin | Published: October 8, 2016 02:18 AM2016-10-08T02:18:34+5:302016-10-08T02:18:34+5:30
काम त्वरित पूर्ण करण्याची शेतक-यांची मागणी.
देपूळ(जि. वाशिम ) : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यंत्रणाद्वारे करण्यात येत असलेल्या पूस नदीवरील पर्यायी पुलाचे काम रखडल्याने शेतकर्यांना चार ते पाच फूट खोल पाण्यातून जुन्या पुलावरून ये-जा करावी लागत आहे. एक हजार ५00 एकर शेतातील सोयाबीनचे पीक शेतात ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी भारिप-बमसंचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडुरंग यांनी ७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनातून केली आहे.
लघु पाटबंधारे विभाग क्रमांक तीन वाशिमच्या अधिपत्याखाली झालेल्या वारा जहागीर बृहत लघु पाटबंधारे योजनेच्या सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्राखाली देपूळ ते बोरी रस्त्यावरील पूस नदीवरील पूल पाच फूट पाण्याखाली गेल्याने बोरी ते देपूळ गावचा संपर्क तुटला असून, या रस्त्यावरून शेती करणार्या २५0 शेतकर्यांच्या १ हजार ५00 शेतातील सोयाबीन पीक शेतात ठेवण्याची वेळ आली.
या पुलाचे काम त्वरित व्हावे, याकरिता लघू पाटबंधारे विभाग क्रमांक तीन वाशिमने १ कोटी ३३ लाखाचा निधी पंतप्रधान ग्राम सडक योजना वाशिमला दोन वर्षांपूर्वी वळता केला; परंतु संबंधित यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्यांना नाहक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या यंत्रणेने संबंधित पुलाचे अर्धवट काम करून आता काम थांबविले आहे. दरम्यान, या पुलाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करणे आवश्यक असल्याने योग्य त्या उपायेयाजना त्वरित करून काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशा सूचना कार्यकारी अभियंता एस.डी.जाधव यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्याला अनेकदा दिल्या; मात्र संबंधित यंत्रणा लक्ष देण्यास तयार नसल्याने शेतकर्यांचे नाहक हाल होत आहेत. याकडे जिल्हाधिकार्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.