तूर खरेदी हमीदरापेक्षा कमी दरानेच!
By Admin | Published: July 11, 2017 07:30 PM2017-07-11T19:30:54+5:302017-07-11T19:30:54+5:30
जिल्ह्यातील वास्तव: नाफेड बंद झाल्यानंतर शेतकरी हताश
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाने यंदा १ जूनपासून नाफेडची खरेदी बंद के ल्यानंतर तूर उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. शेकडो शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही हजारो क्विंटल तूर पडून आहे. हे शेतकरी खरीपात वेळोवेळी लागणाऱ्या शेतीखर्चासाठी तूर बाजारात विकत आहेत; परंतु व्यापाऱ्यांकडून त्यांची तूर हमीदरापेक्षा खूप कमी दराने खरेदी करण्यात येत आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात ६३ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. हवामानाची चांगली साथ मिळाल्याने उत्पादनही भरघोस झाले होते; परंतु या वाणाला शासनाने अत्यंत तोकडा असा प्रति क्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदर जाहीर केला. त्यातच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची तूर त्यापेक्षा खूप कमी दरात खरेदी केली जात असल्याने शासनाच्यावतीने राज्यभरात तूर खरेदी केंद्रं सुरू करून हमीदराने शेतकऱ्यांची तूर खरेदी के ली; परंतु यात अनेक अडचणी आल्या. प्रत्यक्षात शासनाने नियोजन केलेल्या आकड्यापेक्षा खूप अधिक प्रमाणात तूर खरेदी केली तरीही, शेतकऱ्यांकडे लाखो क्विंटल तूर पडूनच होती. अखेर शासनान जूनपासून शासकीय तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. तथापि, त्यापूर्वी टोकण घेतलेल्या शेतकऱ्यांची तूर १० जूनपर्यंत मोजण्यात आली. यातही अनेक शेतकरी मोजणीपासून वंचित राहिले. दरम्यान, शासकीय खरेदी बंद केल्यानंतर व्यापाऱ्यांना हमीदराने तूर खरेदी करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले; परंतु आता महिना उलटत आला तरी, याची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात तरी होत नसल्याचे दिसत आहे. मागील आठवडाभरात जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमधील तुरीचे दर जाणून घेतले असता एकाही बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी किमान ३ हजार ४०० ते कमाल ३ हजार ८५५ पेक्षा अधिक दराने तूर खरेदी केली नसल्याचे आढळून आले. त्यावरून तुरीच्य हमीदराला व्यापाऱ्यांकडून खो देण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.