वर्षभर प्रतीक्षा करून थकले, अखेर जुने सोयाबीन विक्रीस काढले; आणखी दर घसरण्याची भीती
By नंदकिशोर नारे | Updated: September 19, 2023 15:00 IST2023-09-19T14:58:22+5:302023-09-19T15:00:27+5:30
सप्टेंबरअखेर बाजारात वाढली आवक

वर्षभर प्रतीक्षा करून थकले, अखेर जुने सोयाबीन विक्रीस काढले; आणखी दर घसरण्याची भीती
नंदकिशाेर नारे, वाशिम: गतवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत आणि मोठा खर्च करून सोयाबीन पिकविले. तथापि, बाजारात दर पडल्याने आज ना उद्या दर वाढतील, या अपेक्षेने अनेकांनी सोयाबीन साठवून ठेवले. वर्षभर प्रतीक्षा करूनही सोयाबीनचे दर वाढण्याऐवजी कमीच होत गेले. आता पुढे आणखी दर घसरण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवाढीची आशा सोडून जुने सोयाबीन विक्रीस काढले आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेरही जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात गतवर्षी २ लाख ९९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली होती. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे हे पीक वारंवार संकटात सापडले असताना शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करीत सोयाबीन पिकविले. हे साेयाबीन बाजारात दाखल होत असतानाच दरात घसरण सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज ना उद्या दर वाढतील या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवले. वर्षभर प्रतीक्षा करूनही दरात वाढ होण्याऐवजी घसरणच होत असल्याने आता शेतकरी निराश झाले आहेत. पुढे दरवाढीची कुठलीच शक्यता दिसत नसल्याने त्यांनी साठवलेले सोयाबीन विक्रीस काढले आहे. त्यामुळे बाजारात सप्टेंबरअखेरही जुन्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोमवारी कारंजा आणि वाशिम येथील बाजार समितीत प्रत्येकी ४ हजार ५०० क्विंटल जुन्याच सोयाबीनची आवक झाली होती.
सणवारामुळेही बाजारात वाढती आवक
आगामी काळात विविध सणवार साजरे होणार आहेत. त्यामुळे बाजार समित्या बंद राहण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना सण उत्सवासह शेतीकामांसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
नव्या हंगामाचीही तयारी
सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता मुळीच दिसत नाही. त्यात नवा हंगाम तोंडावर आहे. या हंगामातील पिकलेला माल काढून घरी आणणे, तसेच आवश्यकतेनुसार त्याची साठवणूक करण्याची तयारी शेतकऱ्यांना करावी लागणार असल्यानेही सोयाबीन विक्रीवर त्यांनी भर दिला आहे.
कोणत्या बाजार समितीत किती क्विंटल आवक
- वाशिम - ४५००
- कारंजा - ४५००
- मंगरुळपीर १०००
- रिसोड - ७००
- मानोरा - ४००