‘समृद्धी’वर तपासले जाणार वाहनांचे टायर; खबरदारीच्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी
By सुनील काकडे | Published: June 8, 2023 07:00 PM2023-06-08T19:00:37+5:302023-06-08T19:01:07+5:30
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आजपर्यंत घडलेल्या एकूण अपघातात सर्वाधिक प्रमाण टायर फुटून झाल्याचे निदर्शनास आले आहे.
वाशिम: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आजपर्यंत घडलेल्या एकूण अपघातात सर्वाधिक प्रमाण टायर फुटून झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शिर्डी येथे ८ जून रोजी टायर तपासणी केंद्र सुरू करण्यात आले असून याअंतर्गत महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचे टायर तपासले जाणार आहेत, अशी माहिती वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (नागपूर ते शिर्डी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होवून ११ डिसेंबर २०२२ पासून हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. त्यानंतर २६ मे २०२३ पासून शिर्डी ते भरवीर या पुढील मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन हा मार्गही वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
महामार्गावर रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभाग, महामार्ग पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विविध स्वरूपातील उपक्रमांची अंमलबजावणी सातत्याने सुरू आहे. समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातापैकी अधिकांश अपघात हे वाहनांचे टायर फुटल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरील अपघातात घट करण्याच्या उद्देशाने परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सीएट लिमिटेड टायर उत्पादकांमार्फत त्यांच्या तांत्रिक चमूच्या सहकार्याने वाहनांच्या टायर तपासणीची मोहीम हाती घेतली आहे.
तपासणी केंद्रावर न्यावे लागणार वाहन
महामार्गावर प्रवास करताना वाहनांचे टायर योग्य गुणवत्तेचे व सुस्थितीत असणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने प्रवासाच्या सुरूवातीला टायर तपासणी केंद्रावर वाहन नेऊन टायर तपासून घ्यावे लागणार आहे.
विविध सुविधा मोफत उपलब्ध
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांच्या टायरमध्ये नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पीन चेक व रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरुस्ती आणि टायर वेअर चेक यंत्राचे वितरण या सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत.
आयुक्तांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन
नागपूर व शिर्डी या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील टोल प्लाजाच्या सुरूवातीला टायर तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन ८ जून रोजी शिर्डी येथे परिवहन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.