नवीन गाडी घ्यायची, वडीलाकडून पैसे आण; पतीसह सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ
By संतोष वानखडे | Published: October 18, 2023 06:07 PM2023-10-18T18:07:13+5:302023-10-18T18:08:34+5:30
तिघांवर गुन्हा दाखल
संतोष वानखडे, वाशिम : लग्नात हुंडा कमी दिला, नवीन पीकअप गाडी घेण्यासाठी वडीलाकडून एक लाख रुपये आण असे म्हणून पतीसह सासरच्या तिघांनी विवाहितेचा छळ केल्याची घटना फेट्री येथे घडली. विवाहितेच्या तक्रारीवरून १८ ऑक्टोबर रोजी पतीसह सासरच्या तिघांवर मानोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मानोरा तालुक्यातील रामतीर्थ माहेर असलेले दीपाली संदीप शिंदे (२४) हीचा विवाह यवतमाळ जिल्हा दिग्रस तालुक्यातील फेट्री येथील संदीप पंडित शिंदे यांच्याशी १६ मे २०२३ रोजी समाजाच्या रीतीरिवाजनुसार झाला. संयुक्त कुटूंबात आठ दहा दिवस चांगले गेल्यानंतर, लग्नात हुंडा कमी दिला, आंदनसुद्धा बरोबर दिले नाही म्हणून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास सुरू झाला. नवीन पिकअप गाडी घेण्यासाठी वडिलांकडून डाऊनपेमेंट भरण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेकडे तगादा सुरू झाला. कर्ज काढून लग्न केल्याने वडिलांकडे पैसे नसल्यामुळे संसार सुखात चालावे म्हणून फिर्यादी विवाहिता निमूटपणे अन्याय सहन करीत होते.
मोहरवरून पैसे आणत नसल्याचे पाहून पतीने तिला मारहाणही केली. त्रास असह्य झाल्याने शेवटी दीपाली हीने ही बाब वडीलांना सांगितली. वडीलांनी पतीसह सासरच्या मंडळीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र सासरच्या मंडळीने विवाहितेला वडीलासोबत माहेरी पाठविले. याप्रकरणी पिडीत विवाहितेने तक्रार दिल्याने आरोपी पती संदीप पंडित शिंदे, सासू जानकी पंडित शिंदे, भासरा शंकर पंडित शिंदे व जेठानी सुलाबाई शंकर शिंदे यांचे विरुद्ध कलम ४९८, ३४ सह कलम हुंडा प्रति्बंधक अधिनियम १९६१ कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.