तंबाखूमुक्तीसाठी शाळांमध्ये आता तंबाखू निरिक्षक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 05:16 PM2021-02-11T17:16:00+5:302021-02-11T17:16:05+5:30
Washim News सूचना शालेय शिक्षण विभागाने १० फेब्रुवारी रोजी राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.
वाशिम : १३ ते १५ वयोगटातील मुले तंबाखूच्या आहारी जाऊ नये म्हणून 'तंबाखूमुक्त शाळा ' हा उपक्रम राबविला जातो. आता शाळा सुरू झाल्या असून या उपक्रमाची अंमलबजावणी करावी तसेच शैक्षणिक संस्थेने विद्यार्थी, कर्मचाऱ्यांमधून तंबाखू निरिक्षकाची नियुक्ती करावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने १० फेब्रुवारी रोजी राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.
तंबाखू सेवनाने आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, तंबाखू हा कर्करोग, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारासाठी प्रमुख कारणीभूत घटक मानला जातो. ग्लोबल युथ सर्वेनुसार भारतात १३ ते १५ वयोगटातील १४.६ टक्के विद्यार्थी तंबाखू सेवनाच्या आहारी गेलेले आहेत. विद्यार्थ्यांना तंबाखूपासून दूर ठेवणे तसेच तंबाखूची सवय जडलेल्या विद्यार्थ्यांना तंबाखूच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था धोरण-२०२० अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार वाशिमसह राज्यातील शैक्षणिक संस्थांना यापुढे संस्थेच्या परिसरात तंबाखुमुक्त क्षेत्राचा फलक लावावा लागणार आहे.