सभापती-उपसभापती पदांचा आज निर्णय
By Admin | Published: June 27, 2016 02:25 AM2016-06-27T02:25:49+5:302016-06-27T02:25:49+5:30
वाशिम जिल्ह्यातील सहाही पंचायत समिती निवडणूकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
वाशिम : अडीच वर्षांंचा कार्यकाळ २८ जून रोजी संपत असल्याने, जिल्ह्यातील सहा पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी २७ जून रोजी निवडणूक होत आहे. पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी केली असून, सदस्यांची पळवापळवी होऊ नये म्हणून रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरुळपीर येथील सदस्य अज्ञातस्थळी आहेत. दरम्यान, २७ जूनला निवडणूक असल्याने अज्ञातस्थळी असलेले सदस्य सोमवारी जिल्ह्यात दाखल होतील. जिल्ह्यात डिसेंबर २0१३ मध्ये पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. कुण्याही पंचायत समितीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने प्रत्येक पंचायत समितीवर युती, आघाडीची सत्ता आहे. वाशिम पंचायत समिती काँग्रेस-राकाँ, रिसोड भाजपा-शिवसेना, मालेगाव राकाँ-मनसे, मंगरुळपीर राकाँ-अपक्ष, कारंजा काँग्रेस-भारिप, तर मानोरा पंचायत समितीवर काँग्रेस व अपक्षांची सत्ता आहे. आता अडीच वर्षांंचा कार्यकाळ संपत आल्याने २७ जून रोजी वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा, मानोरा व मंगरुळपीर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे. ऐनवेळी धोका नको म्हणून रिसोड, मालेगाव, वाशिम येथील सदस्य अज्ञातस्थळी गेले होते. सोमवारी निवडणूक असल्याने सर्व सदस्य परतले असून, प्रत्यक्षात काय निकाल लागते, हे सोमवारी दुपारनंतर स्पष्ट होणार आहे.