व्याजाने पैसे काढुन शौचालय बांधले; अनुदानासाठी मात्र पायपिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 02:26 PM2018-01-19T14:26:41+5:302018-01-19T14:27:52+5:30
उंबर्डाबाजार : कारंजा तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु असताना उंबर्डाबाजार ग्रा.पं.प्रशासन तथा कारंजा पं.स.च्या स्वच्छता विभागाच्या नाकर्तेपणाचा फटका अनेक गरीब कुटूंबांना बसला आहे.
उंबर्डाबाजार : कारंजा तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु असताना उंबर्डाबाजार ग्रा.पं.प्रशासन तथा कारंजा पं.स.च्या स्वच्छता विभागाच्या नाकर्तेपणाचा फटका अनेक गरीब कुटूंबांना बसला आहे. व्याजाने पैसे काढुन शौचालय बांधणाºया उंबर्डाबाजार येथील सुदाम रायभान मोरे यांच्या कुटूंबीयांवर शौचालयाच्या अनुदानाच्या रक्कमेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.
उंबर्डाबाजार येथील इंदिरानगरमध्ये गेल्या १५ वर्षापासून सुदाम मोरे वास्तव्यास आहे. भूमीहीन असल्यामुळे दररोज मोलमजुरी करुन जीवनक्रम चालवितात. रेशनचे धान्य व विविध कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी शौचालय घरी असणे आवश्यक असल्याच्या शासनाच्या नियमामुळे सुदाम रायभान यांनी ३५ हजार रुपये व्याजाने काढुन गेल्या १ वर्षापुर्वी घरी शौचालय बांधले. मात्र गेल्या एक वर्षापासून सुदाम रायभान मोरे, शौचालयाच्या अनुदानासाठी ग्रा.पं.प्रशासन तथा पंचायत समितीच्या स्वच्छता विभागाकडे चकरा मारीत आहे. एकीकडे गावात ज्यांच्याकडे शौचालये नाहीत अशा नागरिकांना शौचालय अनुदानाचा लाभ मिळाला असतांना ज्यांनी व्याजाने पैसे काढुन शौचालयाचे बांधकाम केले अशांना अनुदानासाठी स्वच्छता विभागाकडे चकरा मारण्याची वेळ मोरे कुटूंबींयावर आली आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही.