शौचालय बांधकामाचा आढावा!
By admin | Published: July 20, 2016 02:04 AM2016-07-20T02:04:35+5:302016-07-20T02:04:35+5:30
२0 ग्रामपंचायतींची कामगिरी शून्य; सुधारणा करण्याचे निर्देश
वाशिम: जिल्ह्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी आता ग्रामसेवकांच्या तालुकानिहाय आढावा सभा लावल्या आहेत. या सभेच्या माध्यमातून कामचुकार आणि अकार्यक्षम ग्रामसेवकांना लक्ष्य केले आहे. मंगळवारी मंगरुळपीर पंचायत समिती येथून आढावा सभेला सुरूवात झाली असून, बुधवारी रिसोड येथे सभा झाली. मंगरुळपीर येथे मग्रारोहयोचे उप जिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, गटविकास अधिकारी राठोड, गणेश देशमुख, जि. प. सदस्य शिवदास राऊत, विश्वास गोदमले आदिंची उपस्थिती होती. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यात सन २0१६-१७ या आर्थिक वर्षाच्या कृती आराखड्यात ३६ ग्रामपंचायतींचा समावेश केला आहे. ऑनलाइन अहवालानुसार ३६ पैकी २0 ग्रामपंचायतीमध्ये या वर्षात आजपर्यंत एकही शौचालय बांधले नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. यावर गणेश पाटील यांनी अशा झीरोवाल्या ग्रामसेवकांना उभे करून गावातील लाभार्थीनिहाय शौचालय बांधकामाचे नियोजन सादर करण्याच्या सूचना दिल्या. मागील साडेतीन महिन्यांत एकही शौचालय न बांधणार्या ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. काम न करण्याची ग्रामसेवकांची प्रवृत्ती गावासाठी तर घातक आहेच; परंतु ती स्वच्छ भारत मिशनच्या राष्ट्रीय कामात बाधा निर्माण करणारी असल्याने यात होत असलेली दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. व्हॉट्स अँप नंबरचे बोर्ड पंचायत समितीत लागले नसल्याची जाणीव करून देत आता प्रत्येक गावातही असा बोर्ड लावण्याचे निर्देश गटविकास अधिकारी राठोड यांना दिले. लोकांनी शौचालय बांधल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले. शौचालय बांधल्यानंतर त्याचे अनुदान वितरित करणे व नंतर त्याची ऑनलाइन माहिती भरणे आवश्यक असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.