स्वच्छता अभियानाचा प्रशासनालाच विसर; मंगरुळपीर पंचायत समितीमधील शौचालय कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:56 PM2018-01-05T13:56:12+5:302018-01-05T13:58:18+5:30
मंगरुळपीर: स्वच्छता अभियान राबवून तालुका हागणदरीमूक्त करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या मंगरुळपीर येथील पंचायत समिती कार्यालयातील शौचालयच कुलूपबंद असून, इतर प्रसाधनगृहांची अवस्थाही घाणीमुळे किळसवाणी झाली आहे.
मंगरुळपीर: स्वच्छता अभियान राबवून तालुका हागणदरीमूक्त करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या मंगरुळपीर येथील पंचायत समिती कार्यालयातील शौचालयच कुलूपबंद असून, इतर प्रसाधनगृहांची अवस्थाही घाणीमुळे किळसवाणी झाली आहे. या प्रकाराकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने येथील कर्मचारी प्रामुख्याने महिला कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबना होत आहे.
राज्य शासनाने येत्या २०१९ पर्यंत राज्य हागणदरीमूक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच स्तरातून त्याबाबत जनजागृती करण्यात येत असून, प्रशासनाला या अभियानाच्या यशस्वीतेसाठी मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गावांगावांत उघड्यावर शौचास जाणाऱ्यां कुटुंबांना शासकीय योजनेंतर्गत शौचालय बांधण्यासह त्याचा वापर करण्याबाबत प्रशासनाकडून प्रोत्साहीत करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मंगरुळपीर पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणारी ६१ गावे हागणदरीमूक्त झाल्याची घोषणाही करण्यात आली; परंतु याच गावांतील चित्र मात्र वेगळे आहे. केवळ शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने हागणदरीमूक्त घोषीत केलेल्या याच गांवात अद्यापही उघड्यावर शौचवारी सुरूच आहे. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे पंचायत समितीच्या कार्यालयातील शौचालय कुलूपबंद ठेवलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना ऐनवेळी बाहेर पडावे लागते. त्याशिवाय या कार्यालयात लघूशंकेसाठी बांधलेल्या प्रसाधनगृहांची अवस्था घाणीमुळे अत्यंत किळसवाणी झाली असल्याने बहुतेक कर्मचारी त्याचा वापर न करता कार्यालयातील आडोशाच्या जागेवरच लघूशंका उरकतात. हा प्रकार स्वच्छता अभियानाच्या अपयशाची पुष्टी देण्यास पुरेसा ठरत असल्याचे स्पष्ट होते.