शौचालयाच्या अनुदानासाठी पायपीट; प्रशासन उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 04:19 PM2018-06-04T16:19:18+5:302018-06-04T16:19:18+5:30
वाशिम: तालुक्यातील मोहजा रोड येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६ मध्ये करण्यात आलेल्या १२ शौचालयांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही.
वाशिम: तालुक्यातील मोहजा रोड येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६ मध्ये करण्यात आलेल्या १२ शौचालयांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. या बाबत संबंधित लाभार्थींनी पंचायत, जिल्हाधिकारी, ते पालकमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करूनही त्याची दखल अद्यापही घेण्यात आली नाही.
मोहजा रोड येथे २०१६ मध्ये अनेक लाभार्थींना शौचालय मंजूर झाले आणि त्या शौचालयांचे काम रोहयो अंतर्गत करण्यात आले. शौचालयांचे काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थींना अनुदान मिळणे अपेक्षीत होते; परंतु अडीच वर्ष उलटत आले तरी, येथील १२ लाभार्थींना शौचालयाचे अनुदानच मिळालेले नाही. या संदर्भात संबंधित लाभार्थींनी गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला निवेदने सादर केली; परंतु त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे समाधान दिवस कार्यक्रमात पालकमंत्र्यांकडे या लाभार्थींनी समस्या मांडली; परंतु त्याचाही फायदाल झाला नाही. विशेष म्हणजे यामध्ये दिव्यांग लाभार्थीचाही समावेश असून, आता या लाभार्थीनी थेट ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे त्यांची समस्या मांडली आहे.