Video - जामदराच्या शेतकऱ्यांची किमया, टोमॅटोतून 13 लाखांचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 03:17 PM2019-04-27T15:17:04+5:302019-04-27T15:46:33+5:30
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पाणीटंचाईमुळे अडचणीत आले असताना मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोच्या पिकातून 13 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
नरेश आसावा
इंझोरी (वाशिम) - वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पाणीटंचाईमुळे अडचणीत आले असताना मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोच्या पिकातून 13 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी शिवारात अनेक शेतकरी रब्बी हंगामानंतर अडाण प्रकल्पातीन पाण्याच्या आधारे भाजीपाला पिकांचे भरघोस उत्पादन घेतात. यंदाही येथील १५ ते २० शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. तथापि, यात विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून अवघ्या एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून योग्य नियोजनाच्या आधारे तब्बल १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. अडाण प्रकल्पात मुबलक पाणी उपलब्ध असताना पिकांच्या वाढीसाठी योग्य खतांचा प्रमाणानुसार प्रभावी करून त्यांनी ही किमया साधली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे दोन्ही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन भरघोस उत्पादन घेत आहेत. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत त्यांचे टोमॅटोचे उत्पादन दुप्पट असल्याने सर्वांसाठी हा आश्चर्याचा विषय ठरला आहे. अद्यापही त्यांच्या शेतातील टोमॅटोची झाडे फळांनी लदबदलीच असून, त्यांची ही शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी जामदरा घोटी येथे येत आहेत.
दिल्लीच्या बाजारात विक्री
जामदरा घोटी येथील गणेश गावंडे आणि विकास थेर यांनी उत्पादित केलेल्या टोमॅटोचा दर्जा अतिशय चांगला आहे. स्थानिक बाजारात त्या टोमॅटोला अपेक्षित दर मिळणार नाहीत. ही जाण त्यांना होती. त्यामुळे अथक परिश्रम घेऊन पिकविलेल्या टोमॅटोला दरही चांगले मिळावे म्हणून त्यांनी दिल्लीच्या बाजारपेठेची निवड केली. त्यांनी आजवर सहा हजारांहून अधिक कॅरेट टोमॅटोची तोडणी करून ते दिल्लीच्या बाजारात विकले आहेत. प्रति कॅरेट ३०० ते ५०० रुपयांचे दर त्यांना या बाजारात मिळाले. आता उर्वरित टोमॅटोची काढणी करून त्यांची विक्रीही दिल्लीच्या बाजारात करण्याचे त्यांनी ठरविले आहे. दरम्यान, त्यांच्या या शेतीमुळे परिसरातील अनेक मजुरांच्या हातालाही काम मिळाल्याचे दिसत आहे.
आणखी ४ लाखांची आशा
जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे यांनी आजवर त्यांच्या टोमॅटो पिकातून तब्बल १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवित सर्वांना चकित केले असले तरी, अद्यापही त्यांच्या शेतातील टोमॅटोच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लागली आहेत. त्या टोमॅटोतून आणखी ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास दोघांनीही व्यक्त केला आहे.