वाशिम येथील बाजारात टोमॅटोचे दर घसरले; कवडीमोल दरात विकावा लागत आहे माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 03:52 PM2018-01-22T15:52:31+5:302018-01-22T15:57:56+5:30
वाशिम: यंदा अल्प पाण्यातही शेतकऱ्यांनी टोमॅटोचे दर्जेदार उत्पादन मिळविण्याची किमया केली. आता हे भाजीपालावर्गीय पिक मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत असताना दरात मात्र प्रचंड घसरण झाली आहे. टोमॅटोचे कॅरेट ५० रुपयांनाही घेण्यास व्यापारी तयार नसल्याने शेतकऱ्यांना आपला कवडीमोल दरात विकावा लागत आहे. लिलावात माल देणे परवडत नसल्याने शेतकरी स्वत:च बाजारात टोमॅटोची विक्री करीत असल्याचे चित्र वाशिम येथील बाजारात पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८४ टक्के पाऊस पडला. याचा परिणाम कृषी उत्पादनावर झाला. त्यातच भाजीपाला उत्पादक शेतकºयांना पिकांसाठी पुरेसे पाणीच नसल्याने त्यांच्या उत्पादनात मोठी घट आली. अशा परिस्थितीतही काही शेतकऱ्यांनी पाण्याचा प्रभावी वापर आणि नियोजनपूर्वक शेती करून टोमॅटोचे पिक घेतले आता. आता जिल्हाभरात टोमॅटोची काढणी सुरू असून, बाजारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. अलिकडच्या काळात टोमॅटो वर्षभर उपलब्ध होत असले तरी, हिवाळ्याच्या दिवसांत याची आवक मोठी असते; परंतु आता टोमॅटोला नगण्य भाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हताश झाले आहेत. बाजारात लिलावात ठेवलेले टोमॅटो घेण्यासाठी खरेदीदारी सहसा मिळेणासे झाले आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी स्वत:च बाजारात कवडीमोल भावात टोमॅटो विकून या पिकासाठी केलेला खर्च वसुल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.