ग्राम स्वच्छता निगरानी समितीला मिळणार टूलकिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:22+5:302021-07-01T04:27:22+5:30

वाशिम : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत स्थापन करण्यात आलेल्या ग्राम स्वच्छता निगरानी समितीला लवकरच टूलकिट मिळणार ...

Toolkit for Village Sanitation Monitoring Committee | ग्राम स्वच्छता निगरानी समितीला मिळणार टूलकिट

ग्राम स्वच्छता निगरानी समितीला मिळणार टूलकिट

Next

वाशिम : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत स्थापन करण्यात आलेल्या ग्राम स्वच्छता निगरानी समितीला लवकरच टूलकिट मिळणार आहेत. दोन समितीला प्रातिनिधिक स्वरूपात टूलकिटचे वितरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते २९ जून रोजी करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात वाशिम तालुक्यातील काटा आणि तामसी या ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सचिव यांना बोलावून स्वच्छता टूलकिटचे वितरण करण्यात आले. तामसी ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्राम निगरानी समितीच्या अध्यक्षा ज्योती कव्हर, ग्रामविकास अधिकारी श्याम बरेटिया, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर कव्हर, प्रल्हाद कव्हर आणि काटा ग्रामपंचायतीच्या सरपंच जया मोरे, उपसरपंच अनिता कंकणे, ग्रामविकास अधिकारी दशरथ राठोड, समिती सदस्य संजय रणखांब यांना टूलकिटचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखडे, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र सोनोने, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे यांची उपस्थिती होती.

गावातील स्वच्छता शाश्वत राहावी आणि उघड्यावरील हगणदारीला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ग्राम स्वच्छता निगरानी समितीचे गठण करण्यात आले. गावातील सरपंचांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार, आशा, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक/ स्वच्छाग्रही, उमेद अभियाच्या सीआरपी महिला आणि गावाचे ग्रामसेवक अशा १० लोकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ५० पैकी प्रातिनिधिक स्वरूपात वाशिम तालुक्यातील २ ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते टूलकिटचे वितरण करण्यात आले आहे. टूलकिटमध्ये ओळखपत्र, टी-शर्ट, टोपी, ॲप्रॉन, हॅण्ड सॅनिटायझर, मास्क, बॅटरी, शिट्टी, कापडी पिशवी ई. बाबींचा समावेश आहे. उर्वरित ४८ ग्रामपंचायतींना पंचायत समिती स्तरावरून टूलकिटचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी दिली.

०००००

टूलकिटचा वापर गुड मॉर्निंग मोहिमेसाठी करावा : पंत

वाशिम जिल्हा परिषदेच्या वतीने जागर स्वच्छतेचा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्थापन झालेल्या ग्राम स्वच्छता निगरानी समितीने गावाच्या संपूर्ण स्वच्छतेचा विडा उचलावा, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी व्यक्त केले. निगरानी समितीच्या सदस्यांशी संवाद साधत पंत यांनी गावाच्या स्वच्छतेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. उघड्यावरील हगणदारीला प्रतिबंध घालण्यासाठी व लोकांना शौचालय वापराची सवय लावण्यासाठी गुड मॉर्निंग मोहीम हे प्रभावी साधन आहे. गुड मॉर्निंग मोहीम राबविण्यासाठी निगरानी समितीला टूलकिट देण्यात येत आहे. सुरुवातील जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने इतर सर्व ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम राबवून जिल्ह्यात ओडीएफ प्लस हे अभियान गतिमान करण्यात येणार असल्याचे मत वसुमना पंत यांनी व्यक्त केले.

Web Title: Toolkit for Village Sanitation Monitoring Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.