तोरणाळा, म्हसणीवासी काढताहेत अंधारात रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 04:41 PM2019-06-22T16:41:53+5:302019-06-22T16:42:02+5:30
इंझोरी (वाशिम): दापूरा वीज उपकेंद्रान्ला जोडलेल्या तोरणाळा आणि म्हसणी गावांत खंडीज वीज पुरवठ्याच्या प्रकाराचा कहर होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (वाशिम): दापूरा वीज उपकेंद्रान्ला जोडलेल्या तोरणाळा आणि म्हसणी गावांत खंडीज वीज पुरवठ्याच्या प्रकाराचा कहर होत आहे. रात्रीला दररोज वीज पुरवठा खंडीत होत असल्याने येथील ग्रामस्थ रात्र अंधारात काढावी लागत आहे. महावितरण मात्र, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण सांगत असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दापूरा वीज उपकेंद्रावरुन इंझोरी सर्कलमधील जवळपास १० ते १५ गावांना वीज पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या सर्कलमधील काही गावांत वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यात मानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या म्हसणी आणि तोरणाळा येथील वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी खंडीत झालेला वीज पुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत सुरळीत होत नाही. तर दिवसाला खंडीत झालेला वीज पुरवठाही १२ तास सुरळीत केला जात नाही. त्यामुळे पाणी पुरवठा योजना प्रभावित होऊन ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, तर पीठ गिरण्या बंद राहत असल्याने भात खाऊन दिवस काढावे लागत आहेत. त्याशिवाय लघू उद्योगांवरही परिणाम होत असून, मोेबाईल रिचार्ज करण्यात अडचणी येत असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी संपर्क साधणेही ग्रामस्थांना कठीण झाले आहे. महावितरणकडे या संदर्भात ग्रामस्थांकडून तक्रारही केली जाते; परंतु मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास विलंब लागतो, असे कारण महावितरणच्या अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे.
दापूरा वीज उपकेंद्रांतर्गत वादळी वाºयामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. ग्रामस्थांना अडचणी येऊ नयेत म्हणून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्नही केले जात आहेत. एखादवेळी मनुष्यबळाच्या अभावामुळे तांत्रिक बिघाड दूर करण्यास विलंब होतो. त्यावरही तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-आशिष कुंभारे
कनिष्ठ अभियंता
वीज उपकेंद्र, दापुरा (ता.मानोरा)
तोरणाळा, म्हसणी येथील वीज पुरवठा १२ तास खंडीत ठेवला जातो. महावितरणकडे विचारणा केल्यानंतर अपुºया मनुष्यबळामुळे तांत्रिक बिघाड दूर करण्यास विलंब लागत असल्याचे सांगण्यात येते. वीज पुरवठा नसल्याने पाणी पुरवठा प्रभावित होत आहेच शिवाय पीठ गिरण्या बंद राहत असल्याने खिचडी खाऊन दिवस काढावे लागत आहे.
- सिताराम बालूसिंग पवार
सरपंच तोरणाळा, ता. मानोरा