बारावीच्या परीक्षेत एकूण १७३४१ विद्यार्थी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 11:14 AM2021-08-04T11:14:47+5:302021-08-04T11:14:55+5:30
HSC Result : जिल्ह्याचा बारावीचा एकूण निकाल ९९.९७ टक्के इतका लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्ह्याचा बारावीचा एकूण निकाल ९९.९७ टक्के इतका लागला आहे. दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही भरघोस लागला आहे. जिल्ह्यातील १७ हजार ३४६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १७ हजार ३४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कोविड-१९ विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीप्रमाणेच बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती.
त्यामुळे मूल्यमापनाच्या आधारे बारावीचा निकाल जाहीर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. त्यानुसार बारावीचे अंतर्गत मूल्यमापन तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील एकूण १७ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १७ हजार ३४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागात वाशिम जिल्हा दुसरा
बारावीच्या निकालात अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात अमरावती विभागात यवतमाळ आणि अकोला जिल्हा ९९.९९ टक्क्यांसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर, तर बुलडाणा ९९.९६ टक्क्यांसह तिसऱ्या आणि अमरावती ९९.९४ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे.