कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची पाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:45 PM2020-09-27T12:45:15+5:302020-09-27T12:46:00+5:30
कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा या तिर्थक्षेत्रावरील प्रमुख यात्रा, कार्यक्रमांना पर्यटकांसह भाविक येऊ शकले नाहीत.
- संतोष वानखडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळख असणारे पोहरादेवी तिर्थक्षेत्र, जैन बांधवांची काशी शिरपूर जैन, मुस्लिम बांधवांचा तºहाळा येथील दर्गा, एकबुर्जी प्रकल्प यासह सहा ते सात प्रमुख तिर्थस्थळ व पर्यटन स्थळे आहेत. कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा या तिर्थक्षेत्रावरील प्रमुख यात्रा, कार्यक्रमांना पर्यटकांसह भाविक येऊ शकले नाहीत. परिणामी, आर्थिक उलाढाल ठप्प झाली.
बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून पोहरादेवी ओळखले जाते. येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने येतात. पोहरादेवी तिर्थस्थळ विकास आराखडा मंजूर असून शासनाकडूनही भरीव स्वरुपात निधीही मिळाला. ‘नंगारा’सह निसर्ग पर्यटन क्षेत्राचे काम अंतिम टप्प्यात आले. जैनांची काशी म्हणून शिरपूर संस्थानकडे पाहिले जाते. येथे संस्थानच्यावतीने विकासात्मक कामे सुरू आहेत. मालेगाव तालुक्यातील डव्हा येथे श्रीनाथ नंगे महाराज महाराज व विश्वनाथ बाबा संस्थान आहे. विदर्भाचे पंढरपूर म्हणून या संस्थानकडे पाहिले जाते. विविध उत्सवानिमित्त येथे भाविकांची मांदियाळी असते. डव्हा संस्थानला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त आहे. नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गावर शेलुबाजार नजीक असलेल्या ग्राम तºहाळा येथे पठाण समुदायाचा जगप्रसिद्ध बाबाजान फकिराबाद दर्गाह असून येथे विविध देशातील भक्तगण मोठ्या श्रद्धेने येतात. यंदा कोरोनाचे संकट असल्याने सर्व कार्यक्रम रद्द आहेत. त्यामुळे पर्यटक, भाविकांनी येणे टाळल्याने आर्थिक उलाढालही झाली नाही.
सर्वांगीन विकासासाठी निधीची प्रतिक्षा कायम
पोहरादेवी येथील तिर्थक्षेत्राचा अपवाद वगळता उर्वरीत तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी भरीव स्वरुपात शासनाकडून निधी मिळाला नाही. त्यामुळे डव्हा, संत सखाराम महाराज संस्थान लोणी, तºहाळा येथील दर्गाह यासह अन्य संस्थान, तिर्थक्षेत्र, पर्यटन स्थळांचा पाहिजे तसा विकास झाला नाही. सर्वांगीन विकास होण्यासाठी शासनाकडून भरीव स्वरुपात निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिरपूर येथे स्वखर्चातून कामे
जैनांची काशी म्हणून मालेगाव तालुक्यातील शिरपूर संस्थानकडे पाहिले जाते. येथे संस्थानच्यावतीने विकासात्मक कामे सुरू आहेत. ही कामे प्रगतीपथावर असून, येथे भाविकांची मांदियाळीही असते. सर्वांगीन विकासासाठी येथके अजून वाव आहे. शासनाकडून निधी मिळाला तर अजून विकास कामे करता येतील.
एकबुर्जी दुर्लक्षितच
वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्प येथे पर्यटकांसह पक्षी अभ्यासक येत असतात. येथे काही वर्षांपूर्वी पर्यटन केंद्रही विकसित करण्यात आले. परंतू, त्यानंतर या केंद्राचा कोणताही विकास करण्यात आला नाही. येथे विकासात्मक कामे झाली तर पर्यटकांची संख्या आणखी वाढू शकते, यात शंका नाही.