वाहतूक नियमांचे उल्लंघन, ३९ परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:04 PM2018-05-10T17:04:45+5:302018-05-10T17:04:45+5:30
उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आणि रस्तासुरक्षा पंधरवड्यांतर्गत ७ मेपर्यंत जिल्हाभरात वाहतूक शाखेच्या सहकार्याने तपासणी मोहिम राबविली आणि विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४१ वाहनचालकांचे परवाने निलंबित केले.
वाशिम: जिल्ह्यात वाढत असलेली अवैध वाहतूक आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे प्रकार वाढले होते. या प्रकरणी लोकमतने २९ एप्रिलच्या अंकात ’मालवाहू वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आणि रस्तासुरक्षा पंधरवड्यांतर्गत ७ मेपर्यंत जिल्हाभरात वाहतूक शाखेच्या सहकार्याने तपासणी मोहिम राबविली आणि विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४१ वाहनचालकांचे परवाने निलंबित केले.
वाशिम जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीसह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रकारांत मोठी वाढ झाली आहे. यात क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक, मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक, परवानाधारकांकडून क्षमता आणि नियमांपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, वेगाच्या नियमांचे उल्लंघन, फिटनेस टेस्ट न झालेली वाहने चालविणे, हेल्मेट न वापरणे, सिटबेल्ट न लावणे आदि प्रकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असतानाही हे प्रकार बिनदिक्कत करण्यात येत होते. लोकमतने प्रामुख्याने मालवाहू वाहनांतून होणारी प्रवासी वाहतूक आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुकीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मालवाहू वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आणि रस्ता सुरक्षा अभियान वेगाने राबवित ४१ वाहनांवर कारवाई करीत चालकांचे परवाने निलंबित केले. यामध्ये मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा आणि वाशिम येथे ३० एप्रिलपर्यंत तपासणी अभियान राबवून अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी २३ चालकांचे परवाने निलंबित केले. त्याशिवाय जादा मालवाहतूक प्रकरणी मालेगाव येथे ५ परवान्यांचे निलंबन, जादा प्रवासी वाहतूक प्रकरणी वाशिम येथे ३ परवान्यांचे निलंबन, कारंजा, वाशिम येथे सिटबेल्ट न लावता वाहन चालविण्याप्रकरणी ३ परवान्यांचे निलंबन, कारंजा, वाशिम येथे वेग मर्यादा उल्लंघनप्रकरणी २ परवान्यांचे निलंबन, तसेच फिटनेसशिवाय वाहन चालविल्याप्रकरणी ३ परवान्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोबतच मालेगाव येथे विना हेल्मेटप्रकरणी २ चालकांवर कारवाई करण्यात आली.