उद्यम अभिलाषा’ उपक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 02:00 PM2018-10-07T14:00:19+5:302018-10-07T14:00:28+5:30
कारंजा लाड : आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ठ असलेल्या वाशिम जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘उद्यम अभिलाषा’ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ठ असलेल्या वाशिम जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘उद्यम अभिलाषा’ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी ८ आॅक्टोबरपर्यंत प्रशिक्षण राहणार असून, कारंजा येथे ६ आॅक्टोबरला प्रशिक्षण देण्यात आले.
कारंजा तालुक्यातील बेरोजगार, होतकरू तरूणांना व महिलांना उद्योग उभारणीस लागणारे भांडवल बॅकेच्या माध्यमातून मिळवून देणे, उद्योगविषयक माहिती देणे या दृष्टिकोनातून मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. मार्गदर्शक म्हणून ‘सीएससी’चे (कॉमन सर्विस सेंटर) जिल्हा समन्वयक भगवंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व्यवस्थापक संजय यादव यांची उपस्थिती होती. ‘नीती आयोग व सिडबी’ यांच्या संयुक्त उपक्रमातून उद्यम अभिलाषा नावाने प्रशिक्षण दिले जात असून, जिल्हातील ४ केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. उद्योजक होण्याकरिता माहिती दिली जात आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बँकांचे कर्ज, मुद्रा लोन आदींसंदर्भात फारशा अडचणी जाणवणार नाहीत, असा दावा केला जात आहे. उद्योजक होण्याकरीता व्यवसाय कौशल्य कसे आत्मसात करावे यामध्ये बँकेशी कशापद्धतीने व्यवहार करावे, आदीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. व्यवसाय सूरू करण्याकरीता लागणारे आर्थिक सहाय्य बँकेकडून मिळविण्याकरीता आॅनलाईन अर्ज, तांत्रिक सहायता आदीसंदर्भात संजय यादव यांनी मार्गदर्शन केले. संचालन केंद्र समन्वयक मनीश भेलांडे यांनी तर आभार अश्विनी डाखोरे यांनी मानले.