शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ‘प्रशिक्षण’ बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 03:38 PM2018-12-26T15:38:36+5:302018-12-26T15:39:28+5:30
वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील तसेच अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे बंधनकारक असून, प्रशिक्षणाची रुपरेषाही शिक्षण विभागाने नव्याने स्पष्ट केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील तसेच अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे बंधनकारक असून, प्रशिक्षणाची रुपरेषाही शिक्षण विभागाने नव्याने स्पष्ट केली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम, २००९ नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे असून, हे शिक्षण देण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे शिक्षकही अधिक चांगल्याप्रकारे प्रशिक्षित होण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणमार्फत विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जातात. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी लागू करण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या सुधारीत कार्यपद्धतीस शिक्षण विभागाने २१ डिसेंबरच्या आदेशान्वये मान्यता दिलेली आहे. वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी प्रशिक्षणांचा कालावधीही निश्चित करण्यात आलेला आहे. प्राथमिक शिक्षकांसाठी भाषा (मुलभूत क्षमता वाचन कार्यक्रम), गणित संबोधन विकासन, तेजस प्रशिक्षण तर माध्यमिक शिक्षकांसाठी अविरत-१, चेस, आयआयटीचे गणित प्रशिक्षण आणि न्यासचे विज्ञान प्रशिक्षण आवश्यक आहे.
राज्य मंडळ पूणे यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पर्यंत ज्या शिक्षकांनी सेवांतर्गत प्रशिक्षणे घेतली आहेत व समाधानकारकरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत, अशा शिक्षकांचे प्रशिक्षण वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत.
सन २०१८-१९ या वर्षापासून वरिष्ठश्रेणीकरीता (१२ वर्षे) १० दिवसांचे प्रशिक्षण व निवड वेतन श्रेणीकरीता (२४ वर्षे) प्रत्येक वर्षी १० दिवसांचे प्रशिक्षण याप्रमाणे सलग ४ वर्षात ४० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर १० दिवसांचे प्रशिक्षण हे शिक्षकांना ज्या वर्षात १२ वर्षे पूर्ण होणार आहेत; त्यापूर्वीच्या कोणत्याही ३ पैकी २ वर्षात पूर्ण केलेली असावी तसेच ४० दिवसांचे प्रशिक्षण हे शिक्षकांना ज्या वर्षी २४ वर्षे पूर्ण होणार आहेत; त्यापूर्वीच्या ५ वर्षांपूर्वी ४ वर्षात पूर्ण करणे आवश्यक आहे.
स्वतंत्र प्रशिक्षणाला मनाई
केवळ वरिष्ठ अथवा निवड वेतन श्रेणीसाठी विद्या प्राधिकरणातर्फे अथवा राज्य मंडळातर्फे यापुढे वेगळ्याने अथवा स्वतंत्र प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे शिक्षण विभागाने शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (विद्या प्राधिकरण) प्रत्येक वर्षी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतील, या प्रशिक्षणांचा एकत्रितरित्या कालावधी पूर्ण केल्यास सदर प्रशिक्षणे ही वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.