वर्षभरापासून प्रशिक्षण प्रलंबित अन् नोकरीही लटकली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:12+5:302021-02-15T04:35:12+5:30
वाशिम : राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागात २०१९मध्ये राबविण्यात आलेल्या चालक-वाहक पदभरतीत निवड झालेल्या एकूण २४ उमेदवारांमधील वाशिम जिल्ह्यातील ...
वाशिम : राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागात २०१९मध्ये राबविण्यात आलेल्या चालक-वाहक पदभरतीत निवड झालेल्या एकूण २४ उमेदवारांमधील वाशिम जिल्ह्यातील ११ उमेदवारांचे १२ दिवसांचे प्रशिक्षण प्रलंबित असून, नोकरीही अधांतरी लटकली आहे. महामंडळातील सावळ्या गोंधळामुळे संबंधित उमेदवारांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे.
दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगारांसाठी २०१९मध्ये एस. टी. महामंडळात नोकरी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सुमारे ५ ते ६ हजार मुलांमधून २४ जणांची अंतिम यादी जाहीर झाली. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्व उमेदवारांना ४८ दिवसांचे चालकाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर १५ दिवसांचे वाहक प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांना नियुक्ती आदेश मिळणार होते; मात्र वाहकाचे केवळ ३ दिवसांचे प्रशिक्षण झालेले असतानाच कोरोनाचे संकट उद्भवले. त्यामुळे प्रशिक्षणाला ‘ब्रेक’ लागला. तेव्हापासून आजतागायत निवड झालेल्या उमेदवारांनी वारंवार विभाग नियंत्रक कार्यालयाचे उंबरठे झिजवले; परंतु त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या निवड झालेल्या उमेदवारांमधील काहींनी अन्य जिल्ह्यांमधील नोकरी सोडून भरती प्रक्रियेत उडी घेतली होती; मात्र उद्भवलेल्या समस्येमुळे हे उमेदवारही आता बेरोजगार झाले आहेत.
................
३००० जणांनी जिल्ह्यातून केले होते अर्ज
११ जणांची झाली निवड
................
कोरोनामुळे लटकले प्रशिक्षण
२०१९मध्ये राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या २४ जणांना ४८ दिवसांचे चालकाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर १५ दिवसांचे वाहकाचे प्रशिक्षण होणार होते; मात्र कोरोनाच्या संकटामुळे ३ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर पुढची प्रक्रिया थांबविण्यात आली. तेव्हापासून ना प्रशिक्षण झाले ना नियुक्ती मिळाली.
.................
वारंवार पाठपुरावा करूनही प्रयत्न निष्फळ
कोट :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने काढलेल्या जाहिरातीनुसार पदभरतीसाठी अर्ज केला. सर्व भरती प्रक्रिया पूर्ण करून निवड झाली; मात्र वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटूनही नियुक्ती मिळालेली नाही.
- सचिन मनवर, मंगरूळपीर
..............
भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व निकषांचे पालन करून निवड झाली असताना, वर्षभरापासून राहिलेले केवळ १२ दिवसांचे प्रशिक्षण देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे नियुक्तीचा प्रश्नही प्रलंबित राहिला आहे.
- नीलेश चौधरी, मानोरा
............
कोरोना संकटकाळात प्रशिक्षण देणे शक्य नाही, हे मान्य आहे; मात्र आता पूर्ण क्षमतेने एस. टी.चा प्रवास सुरू झालेला आहे. असे असताना वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली काढण्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
दिनेश चव्हाण, मंगरूळपीर
..............
हजारो मुलांमधून रितसर निवड झाल्यानंतर पुणे येथे चालकाचे प्रशिक्षण देण्यात आले. वाहकाच्या कामकाजाचे १२ दिवसांचे राहिलेले प्रशिक्षण देऊन रखडलेली नियुक्ती देण्याची प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी, अशी अपेक्षा आहे.
निखील जटाळे, वनोजा
................
विभाग नियंत्रकांचा कोट
राज्य परिवहन महामंडळांतर्गत अकोला विभागात २०१९मध्ये राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत २४ उमेदवारांची निवड झालेली आहे. वरिष्ठ स्तरावर निर्देश मिळताच त्यांचे प्रलंबित असलेले १२ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करून नियुक्ती देण्याचा प्रश्न निकाली काढला जाईल.
- चेतना खिरवाडकर
विभाग नियंत्रक, अकोला