‘ट्रान्सफॉर्मर’ नादुरूस्त; पुनर्वसीत पांगरखेडा अंधारात, रब्बीची पिकेही संकटात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 03:13 PM2018-10-24T15:13:50+5:302018-10-24T15:14:08+5:30
वाशिम : सिंचन प्रकल्प निर्मितीमुळे पुनर्वसन झालेल्या जिल्ह्यातील पांगरखेडा (ता.मालेगाव) या गावातील जुना ‘ट्रान्सफॉर्मर’ जळून नादुरूस्त झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सिंचन प्रकल्प निर्मितीमुळे पुनर्वसन झालेल्या जिल्ह्यातील पांगरखेडा (ता.मालेगाव) या गावातील जुना ‘ट्रान्सफॉर्मर’ जळून नादुरूस्त झाला. तो दुरूस्त करून कार्यान्वित करण्यास विलंब होत असल्याने गेल्या १० दिवसांपासून गावातील अनेक घरांमध्ये अंधार पसरण्यासोबतच ३० ते ४० शेतकºयांच्या सुमारे ३०० एकर शेतीची सिंचनाची कामे खोळंबली आहेत. यामुळे रब्बी हंगाम पुरता संकटात सापडला आहे.
मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पामुळे पांगरखेडा या गावाचे पुनर्वसन झाले. त्यामुळे या गावाला मंजूर झालेल्या विविध सुविधांमध्ये शिरपूर ३३ केव्ही उपकेंद्रांवरून गावात व शेतीला वीज पुरविण्यासाठी नवीन ‘ट्रान्सफॉर्मर’ही मंजूर झाला होता. मात्र, चार महिन्यांपासून हा ‘ट्रान्सफॉर्मर’ तसाच पडून असल्याने त्याचा काहीच फायदा झालेला नाही. जुना ‘ट्रान्सफॉर्मर’ही साधारणत: १० दिवसांपूर्वी जळून नादुरूस्त झाला. तो चार दिवसांपूर्वी २० आॅक्टोबरला वाशिम येथे दुरूस्तीसाठी पाठविण्यात आला. मात्र, कार्यान्वित करण्यास विलंब लागत असल्याने ग्रामस्थ व शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
तथापि, सद्या सुरू असलेल्या रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी वीजेची नितांत गरज भासत असल्याची बाब लक्षात घेवून महावितरणने विजेसंदर्भातील उद्भवलेल्या समस्या तत्काळ निकाली काढाव्या, अशी मागणी जोर धरत आहे.