अकोला-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक जुन्या पुलावरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 03:57 PM2019-06-29T15:57:14+5:302019-06-29T15:57:45+5:30
शुक्रवारच्या जोरदार पावसाने खरडून गेल्याने अकोला-मंगरुळपीर मुख्य मार्ग बंद पडला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक चिखली येथून जाणाºया मार्गावरील जुन्या पुलावरून सुरू आहे.
- साहेबराव राठोड
शेलुबाजार (वाशिम) : राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने शेलुबाजार येथील अडाण नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे केलेला वळणमार्ग शुक्रवारच्या जोरदार पावसाने खरडून गेल्याने अकोला-मंगरुळपीर मुख्य मार्ग बंद पडला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक चिखली येथून जाणाºया मार्गावरील जुन्या पुलावरून सुरू आहे. आधीच हा पुल कमी उंचीचा आणि जुना आहे. त्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतुक होणे, ही धोक्याची बाब ठरू शकते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने अकोला ते मंगरुळपीर आणि यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीदरम्यान एनएच १६१ ए या महामार्गाचे काम गेल्या सात महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे. यात शेलुबाजार ते मंगरुळपीर या मार्गाचे काम करताना ऐन पावसाळ्यापूर्वी कंत्राटदाराने पुलाची कामे सुरू केली. त्यात हिसई येथील मडाण नदी, शेलुबाजार येथील अडाण नदी, तसेच इतर दोन, चार नाल्यांवरील पुलांचा समावेश आहे. हिसई येथील पुलाचे काम पूर्ण झाले, तर अडाण नदीवर शेलुबाजारनजिकच्या पुलाचे काम अर्धवटच आहे. या पुलाच्या कामामुळे मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वळणमार्ग तयार करण्यात आला; परंतु हा वळण मार्ग तयार करताना संभाव्य पूर परिस्थितीत पाणी वाहून जाण्यासाठी पाईप लावण्यात आले नव्हते. अशातच शुक्रवारी शेलुबाजार परिसरात धो-धो पाऊस पडल्याने अडाण नदीला पूर आला आणि या पुरात निर्माणाधीन पुलासाठी लावलेल्या सेंट्रिंगसह वळणमार्गही पुरात वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आता ही वाहतूक नजिकच्याच चिखली येथून जाणाºया मार्गावरून सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर एक जुना आणि अरुंद पुल असल्याने या पुलावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होणे ही धोक्याची बाब ठरू शकते.
वाहतूक रात्रभर होती ठप्प
अडाण नदीला आलेल्या पुरामुळे निर्माणाधीन पुलानजिकचा मार्ग वाहून गेला, पुलाच्या कामासाठी लावलेले सेंट्रिंगही वाहून गेले आणि नदी दुथडी भरून वाहू लागल्याने अकोला-मंगरुळपीर दरम्यानची या पुलावरील वाहतूक शुक्रवारी सायंकाळपासून बंद पडली. ही वाहतूक रात्रभर बंद होती. शनिवारी सकाळी ही वाहतूक सुरू झाली आणि तीसुद्धा चिखली-शेलुमार्गावरील जुन्या पुलावरून. कंत्राटदाराने वेळीच दखल न घेतल्याने हा प्रकार घडला असून, याचा फटका प्रवासी, वाहनधारकांसह सर्वसाधारण जनमतेला सहन करावा लागत आहे.