परिवहन महामंडळाच्या एसटीने प्रवास करायचाय; मग द्या धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 05:17 PM2018-08-02T17:17:28+5:302018-08-02T17:17:44+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत वाशिम जिल्ह्यातील आगारांमधून धावणाऱ्या अनेक बसेस सद्या जुनाट झाल्या
वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत वाशिम जिल्ह्यातील आगारांमधून धावणाऱ्या अनेक बसेस सद्या जुनाट झाल्या असून, अधूनमधून त्या बंद पडण्याचा प्रकार वाढला आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे रात्रीच्या मुक्कामाला आगारात उभ्या राहणा-या अनेक बस सकाळी धक्का दिल्याशिवाय सुरू होणे अशक्य ठरत आहे. त्यामुळे वाहकासोबतच प्रवाशांनाही जोपर्यंत बस सुरू होत नाही, तोपर्यंत धक्का द्यावा लागत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील कारंजा आगाराची एमएच ४० / ८८३५ या क्रमांकाची बस गुरुवारी सकाळच्या सुमारास बंद पडली. दरम्यान, या बसच्या वाहकासोबतच प्रवाशांनी बसला धक्का दिला. त्यामुळे ब-याच वेळानंतर ही बस सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार नित्याचाच झाला असून, परिवहन महामंडळाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.