आईचा पत्ता लागण्यापूर्वीच बिबटचा बछडा जंगलात पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 04:28 PM2019-04-19T16:28:57+5:302019-04-19T16:29:20+5:30
आईचा शोध घेऊन त्याला तिच्या जवळ सोडण्याच्या प्रयत्नात झालेल्या निष्काळजीमुळे पिंजरा उघडल्याने हा बछडा पिंजºयाबाहेर पडून जंगलात पसार झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: चार दिवसांपूर्वी पांगराबंदीच्या जंगलात कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबटच्या बछड्याला वनविभागाने सुखरुप बाहेर काढले खरे; परंतु त्याच्या आईचा शोध घेऊन त्याला तिच्या जवळ सोडण्याच्या प्रयत्नात झालेल्या निष्काळजीमुळे पिंजरा उघडल्याने हा बछडा पिंजºयाबाहेर पडून जंगलात पसार झाला. त्याचा शोध वनविभागाला लागला असून, आता त्याची आई त्याच्याकडे येतेय का, हे पाहण्यासाठी वनविभाग त्याच्यावर पाळत ठेवून आहे.
बिबट्याचा एक बछडा (पिल्लू) सोमवार १४ एप्रिल रोजी मालेगाव तालुक्यातील पांगराबंदीच्या जंगलातील एका कोरड्या विहिरीत पडला होता. ही माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीर, वत्सगुल्म जैवविविधता संस्था वाशिमच्या सदस्यांच्या सहकार्याने मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाºयांनी त्याला चार तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढले. तथापि, या बछड्याला पिंजºयात कायम ठेवणे योग्य नसून, त्याला त्याच्या अधिवासात सोडणे आवश्यक होते; परंतु त्यासाठी त्याच्या आईचा शोध घेऊनच ही मोहिम पार पाडावी लागणार होती. त्यामुळे वनविभागाने पिंजरा जंगलात नेऊन एका जागेवर ठेवला, तसेच परिसरात ट्रॅप कॅमेरे लावून त्यावर पाळत ठेवली. बिबटच्या पिलाची आई त्याच्याजवळ आल्याची खात्री झाली की, मग पिंजºयाच्या फाटकाला बांधलेली दोरी ओढून त्याला बाहेर सोडण्यात येणार होते; परंतु हा प्रकार घडण्यापूर्वीच पिंजºयाच्या फाटकाची दोरी तुटली आणि फाटक उघडल्याने त्या बछड्याने धुम ठोकली. या बछड्याची शिकार करण्याची क्षमता नसून, तो सर्वस्वी त्याच्या आईवर अवलंबून आहे. त्यामुळे त्याचा जीव आता धोक्यात आहे. दरम्यान, वनविभागाला तो बछडा दिसला असून, आता त्याची आई त्याच्याजवळ येते काय, त्यासाठी पाळत ठेवली जात आहे.