वळण घेताना ट्रॅव्हल्स बस ट्रेलरची धडक, २ गंभीर; पेडगावनजीकची घटना 

By दिनेश पठाडे | Published: June 21, 2024 09:24 PM2024-06-21T21:24:17+5:302024-06-21T21:24:27+5:30

गंभीर जखमीत बसचालकाचा समावेश, पेडगावनजीकची घटना: १५ प्रवाशांना किरकोळ दुखापत

Travels bus collided with trailer while turning, 2 serious  | वळण घेताना ट्रॅव्हल्स बस ट्रेलरची धडक, २ गंभीर; पेडगावनजीकची घटना 

वळण घेताना ट्रॅव्हल्स बस ट्रेलरची धडक, २ गंभीर; पेडगावनजीकची घटना 

वाशिम : पुणे येथून कारंजाकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस आणि विरूद्ध दिशेने येत असलेल्या ट्रेलरची जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हल्स बसच्या चालकासह दोन जण गंभीर जखमी झाले, तर १५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. ही घटना नागपूर ते संभाजीनगर द्रुतगती मार्गावर शेलुबाजार ते कारंजादरम्यान पेडगावनजिकच्या वळणावर शुक्रवारी सकाळी घडली.

शुक्रवार २१ जून रोजी एका ट्रॅव्हल्स कंपनीची एमपी १३ झेड के ९११९ क्रमांकाची बस पुणे येथून कारंजाकडे जात होती, तर एम एच ३४ बीजी १०१५ क्रमांकाचा एक ट्रेलर कारंजाकडून येत होता. या दोन वाहनांची पेडगावनजिक असलेल्या एका वळणावर जबर धडक झाली. या अपघातात संजयकुमार सोमवंशी (४० वर्षे, रा. जवळा ता. पारनेर जि.अहमदनगर), गजानन पराड (५४ वर्षे, रा. पुणे), पद्माकर उदापूरकर (६२ वर्षे रा. बेनोडा ता.अमरावती), उमेश शेंडे (३२ वर्षे रा. बोरी ता. चांदुररेल्वे), विजय गजबे (३२ वर्षे रा. वरुड जि. अमरावती), मीनाक्षी गजबे (५० वर्षे रा. वरुड जि.अमरावती), चंद्रशेखर दोहाते (३६ वर्षे रा. वरुड), नवल देवते (४० वर्षे) व संगिता देवते (३४ वर्षे रा. लोणी ता. वरुड) या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, तर बस चालकासह २ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी मोहम्मद परसुवाले, खुशाल गाडे घटना स्थळी दाखल झाले. तर १०८ रुग्णवाहिकेचे पायलट रामचंद्र कांबळे, मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राजेश चौधरी, डॉ. सावरकर, किशोर खोडके, डॉ. मिश्रा हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी विजयकुमार चौधरी (२५ वर्षे, रा. अमरावती) याला अकोला येथे हलविले, तर किरकोळ जखमींना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

गंभीर जखमीला काढण्यासाठी जेसीबीचा आधार
या अपघातामुळे बसच्या केबिनमध्ये अडकलेला चालक विजयकुमार चौधरी याला बाहेर काढण्यासाठी पोलीस व ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली. दोन तासानंतर जेसीबी व एका ट्रकच्या मदतीने त्याला बाहेर काढून शेलुबाजार येथील आरोग्य केंद्रात व तेथून पुढील उपचारार्थ अकोला रवाना करण्यात आले. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक   खोळंबली होती.

Web Title: Travels bus collided with trailer while turning, 2 serious 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात