ट्रॅव्हल्सच्या चालकांची होणार मद्य तपासणी; भोजनासाठी थांबलेल्या ढाब्यांवरही निगराणी
By संतोष वानखडे | Published: July 17, 2023 04:36 PM2023-07-17T16:36:36+5:302023-07-17T16:36:51+5:30
वाशिम जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ५४ गावांमधून गेलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ११ डिसेंबर २०२२ रोजी शिर्डीपर्यंत वाहतुकीस खुला झाला.
वाशिम : मद्यप्राशन करून खासगी प्रवास वाहन चालविल्याने समृद्धीसह राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या काही घटना घडल्याचे चालकांच्या वैद्यकीय तपासणीतून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अपघाताच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वाशिम उपप्रादेशिक परिवहन विभागाने लांब मार्गावर धावणाऱ्या खासगी लक्झरी बसेसच्या (ट्रॅव्हल्स) चालकांची मद्य तपासणी मोहिम हाती घेतली आहे.
वाशिम जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ५४ गावांमधून गेलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ११ डिसेंबर २०२२ रोजी शिर्डीपर्यंत वाहतुकीस खुला झाला. पहिल्या टप्प्यात नागपूरपासून शिर्डीपर्यंत; तर २६ मे २०२३ पासून शिर्डी ते भरवीर यादरम्यान वाहतूकीस परवानगी दर्शविण्यात आली. समृद्धी महामार्गाने नागपूर ते मुंबईचे अंतर कापण्याचा कालावधी कमी केल्याने आणि वाहतुकीस कोणताही अडथळा नसल्याने या महामार्गावरून भरधाव वेगाने वाहनांचा सुसाट प्रवास सुरू आहे.
अपघाताच्या घटनाही घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अपघाताच्या घटना टाळण्याचा प्रयत्न म्हणून उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेत खासगी लक्झरी बसला अपघात होऊन २५ प्रवाशांना जीव गमवावा लागला. चालकाने मद्य प्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालावरून समोर आले. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्ग, याशिवाय अन्य राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या खासगी लक्झरी बसेसची तसेच चालकांची तपासणी मोहिम वाशिम उपप्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. मद्य प्राशन करून लक्झरी बस चालविल्याचे तपासणीअंती आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
ढाब्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बंधनकारक!
भोजनासाठी खासगी प्रवासी वाहने वाशिम जिल्हा हद्दीतील काही ढाब्यांवर थांबतात. अशा ठिकाणी चालक व क्लीनर हे मद्यप्राशन तर करीत नाही ना? याची पडताळणी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने ज्या ठिकाणी भोजनाला बसतात, त्याठिकाणी आता ढाबा मालकाला सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
... तर ढाबा मालकावरही गुन्हा दाखल!
एखाद्या ढाब्यावर लांब पल्ल्याच्या लक्झरी बसच्या चालक व क्लिनरने मद्यप्राशन करून लक्झरी बस चालविल्याचे तपासणीअंती आढळून आल्यास संबंधित बसच्या चालक व क्लिनरसोबतच ढाबा मालकावरही गुन्हा दाखल करण्याची तयारी उपप्रादेशिक परिवहन विभागाने चालविली आहे. तशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या.
ब्रीथ अँनालायझरद्वारे तपासणी
खासगी व स्लिपरकोच लक्झरी बस चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाची करडी नजर राहणार आहे. या बस चालकांना थांबवून ब्रीथ अँनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे.
अलिकडेच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेत खाजगी लक्झरी बसला अपघात होऊन २५ प्रवाशांना जीव गमवावा लागला. अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी लांब मार्गावर धावणाऱ्या खासगी लक्झरी बसेसच्या चालकांची मद्य तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी नियमितपणे सुरु राहणार आहे.
- ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम