बंजारा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासन कटिबध्द : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By संतोष वानखडे | Published: February 12, 2023 05:41 PM2023-02-12T17:41:30+5:302023-02-12T17:43:12+5:30
बंजारा समाजाची काशी म्हणून जगविख्यात असलेल्या तिर्थक्षेत्र पोहरादेवी विकासाकरिता राज्य शासनाने तिजोरी खुली केली आहे.
मानोरा (वाशिम) : बंजारा समाजाची काशी म्हणून जगविख्यात असलेल्या तिर्थक्षेत्र पोहरादेवी विकासाकरिता राज्य शासनाने तिजोरी खुली केली आहे. समृद्ध संस्कृती लाभलेल्या कष्टकरी बंजारा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासन कटिबध्द आहे, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे दिली.
श्री क्षेत्र पोहरादेवी येथे रविवारी संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ २१ फूट उंच पुतळ्याचे अनावरण, १३५ फूट उंच सेवाध्वजाची स्थापना आणि नंगारा वास्तूच्या वाढीव बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार निलय नाईक, राजेंद्र पाटणी, किरणराव सरनाईक, महंत बाबुसींग महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत कबिरदास महाराज, महंत यशवंत महाराज, महंत शेखर महाराज, संजय महाराज आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सेवाध्वजची स्थापना आणि संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आमच्या हस्ते झाल्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे. पोहरादेवीच्या विकासासाठी सरकार कटिबध्द असून बंजारा समाजाचे मूलभूत प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.
समाजासाठी नंगारा बोर्ड स्थापन करून ५० कोटींचा निधी दिला जाईल. यासह तांडा सुधार योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही. नवी मुंबईत बंजारा समाज भवन स्थापन केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. त्यांनी समाज बांधवांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचे मूलभूत प्रश्न उजागर केले. विविध स्वरूपातील २८ मागण्या शासनाने पूर्ण कराव्या, अशी गळ त्यांनी घातली. त्यातील बहुतांश मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या, हे विशेष.
शिंदेंचा ठाकरेंना टोला
यापूर्वीच्या सरकारने पोहरादेवी विकासाकरिता खडकुही दिला नाही. मात्र नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या चार महिन्यांतच ५९३ कोटीचा निधी देण्यात आला, असे सांगून शिंदे यांनी अप्रत्यक्षरीत्या उध्दव ठाकरे यांना टोला लगावला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संजय राठोड आमचे मंत्री असून ते समाजाच्या मागण्यांसाठी आमच्या पाठीमागे लागलेले असतात. जेव्हा संजय राठोड संकटात होते, तेव्हा मी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही संजय राठोड यांच्या पाठीशी खांबासारखे उभे राहीलो. तेव्हा काही लोकांनी हात वर केले, असा टोलाही लगावला.