बंजारा समाजासाठी तिजोरी खुली केली - मुख्यमंत्री शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 10:43 AM2023-02-13T10:43:35+5:302023-02-13T10:44:06+5:30
मुख्यमंत्री शिंदे : पोहरादेवीत संत सेवालाल महाराज पुतळ्याचे अनावरण
लाेकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (जि. वाशिम) : बंजारा समाजाची काशी म्हणून जगद्विख्यात असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी विकासाकरिता राज्य शासनाने तिजोरी खुली केली आहे. समृद्ध संस्कृती लाभलेल्या कष्टकरी बंजारा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पोहरादेवी येथे दिली.
श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे रविवारी संत सेवालाल महाराजांच्या अश्वारुढ २१ फूट उंच पुतळ्याचे अनावरण, १३५ फूट उंच सेवाध्वजाची स्थापना आणि नगारा वास्तूच्या वाढीव बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी महंत बाबूसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत यशवंत महाराज, महंत शेखर महाराज आदी उपस्थित होते.
समाजासाठी नगारा बोर्ड स्थापन करणार
समाजासाठी ‘वनार्टी’ (वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्था, तसेच नगारा बोर्ड स्थापन करून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल.
‘माझ्याकडे तिजोरीची चावी सोपविली’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीचा कायापालट केला. आम्ही बंजारा समाजाची काशी पोहरादेवीचा कायापालट करू. पोहरादेवी विकासाकरिता निधी कमी पडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे तिजोरीची चावी सोपवली, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
‘तेव्हा हात वर केले’
यापूर्वीच्या सरकारने पोहरादेवी विकासाकरिता एकही पैसा दिला नाही. आम्ही पहिल्या चार महिन्यांतच ५९३ कोटींचा निधी दिला. संजय राठोड संकटात होते, तेव्हा मी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही त्यांच्या पाठीशी खांबासारखे उभे राहिलो. तेव्हा काही लोकांनी हात वर केले, असा चिमटाही त्यांनी काढला.