पदवी नसतानाही अनेकजण करताहेत पशूंवर उपचार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:59 PM2018-04-02T16:59:42+5:302018-04-02T16:59:42+5:30
रिसोड - पशू वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना ग्रामीण भागात अनेकजण पशूंवर उपचार करीत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एका कर्मचाऱ्याच्या चुकीच्या उपचार पद्धतीने दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची तक्रार प्राप्त होताच, पशूसंवर्धन विभागाने तालुक्यातील पशु पर्यवेक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- निनाद देशमुख
रिसोड - पशू वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना ग्रामीण भागात अनेकजण पशूंवर उपचार करीत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एका कर्मचाऱ्याच्या चुकीच्या उपचार पद्धतीने दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची तक्रार प्राप्त होताच, पशूसंवर्धन विभागाने तालुक्यातील पशु पर्यवेक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धोत्पादन व्यवसायाकडे वळत आहेत. ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात पशुचिकित्सा केंद्र, दवाखाने आणि मनुष्यबळ नसल्याचे पाहून काही जण पशुवैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसतानादेखील पशुंवर उपचार करतात. पशुसंवर्धन केंद्रातील काही परिचरही पशुंवर वैद्यकीय उपचार करतात, अशा तक्रारी पशूसंवर्धन विभागाला प्राप्त होत आहेत. वाकद येथील प्रकाश प्रभाकर हरिमकर यांनी रिसोडच्या गटविकास अधिकाºयांकडे तसेच पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार केली असून, वाकद पशुसंवर्धन दवाखान्यात परिचर म्हणून सेवा देणाऱ्यां तत्कालीन कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद केले. काही महिन्यांपूर्वी सदर परिचर कर्मचाऱ्याची रिसोड पंचायत समिती येथे कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नती झाली. तथापि, ते वाकद परिसरात पशूंवर उपचार करतात. त्यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीने जनावराचा मृत्यू झाल्याने ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असून भरपाई मिळावी, यासाठी हरिमकर यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, अद्यापही भरपाई मिळाली नाही, असे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीची दखल घेत पशूसंवर्धन विभागाने तालुक्यातील पशूधन पर्यवेक्षकांना सूचना दिल्या की, आपल्या कार्यक्षेत्रात पदवी नसतानाही कुणी पशूंवर उपचार करीत असेल तर संबंधितांविरूद्ध तातडीने कारवाई करावी. संंबंधितांविरूद्ध कारवाई झाली नाही तर संबंधित पशूधन पर्यवेक्षांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. दरम्यान, वाकद येथील पशुसंवर्धन दवाखान्यात परिचर म्हणून सेवा देणाऱ्यां त्या तत्कालिन कर्मचाऱ्याला पशूंवर उपचार न करण्याची ताकीद दिली आहे. सदर कर्मचारी वाकद कार्यक्षेत्रात आढळून आल्यास पशुधन पर्यवेक्षकांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे रिसोड येथील पशुसंवर्धन अधिकारी प्रियंका जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वाकद येथील ‘त्या’ संबंधित कर्मचाऱ्यांचा आता पशुसंवर्धन खात्याची कुठलाही संबंध राहिला नाही. यापुढे संबंधित कर्मचारी वाकद कार्यक्षेत्रात आढळून आल्यास वाकद येथील पशूउपचार केंद्रातील पशुधन पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यात येईल.
- प्रियंका जाधव, पशुसंवर्धन अधिकारी, रिसोड