जिल्ह्यात कोरोना काळात १२६ कुपोषितांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:57 AM2021-02-20T05:57:31+5:302021-02-20T05:57:31+5:30
नवजात बालकांच्या जीवनातील सुरूवातीचे हजार दिवस अत्यंत महत्वाचे असतात. पहिल्या दोन वर्षांत बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ होत असते. ...
नवजात बालकांच्या जीवनातील सुरूवातीचे हजार दिवस अत्यंत महत्वाचे असतात. पहिल्या दोन वर्षांत बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ होत असते. या कालावधीत त्यांचे आरोग्य व पोषणाकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वयाच्या मानाने उंची, उंचीच्या मानाने वजन योग्य असणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने शासनस्तरावरून प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय कुपोषणमुक्तीसाठी २००५ मध्ये स्थापन झालेल्या राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनमार्फत माता सक्षमीकरणाची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. कुपोषण निर्मूलनाकरिता ग्राम बालविकास केंद्र हा उत्तम पर्याय ठरत असून याअंतर्गत सॅम व मॅम या घटकात मोडणाऱ्या बालकांवर उपचार केले जात आहेत. त्यानुषंगाने १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत ‘सॅम’ घटकातील ३४१ बालके दाखल झाली होती. त्या सर्वांवर उपचार करण्यात आले असून २८१ बालकांच्या प्रकृतीत पूर्णत: सुधारणा झाली. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत ५० बालके पूर्णत: बरी झाली; तर १ एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत ठणठणीत होणाऱ्या बालकांची संख्या १२६ आहे. चालूवर्षी आतापर्यंत ७ पैकी २ बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून प्राप्त झाली.
.....................
कोणत्या वर्षांत किती कुपोषितांवर उपचार
२०१८ - २८१
२०१९ - ५०
२०२० - १२६
..........................
तीन वर्षांत ४५७ बालके कुपोषणमुक्त
जिल्ह्यात २०१८ ते २०२० या तीन वर्षांत ग्राम बालविकास केंद्रात उपचाराकरिता एकूण ५३९ कुपोषित बालके दाखल झाली. त्यांच्यावर टप्प्याटप्प्याने उपचार करत ४५७ बालकांना कुपोषणमुक्त करण्यात आले. विशेष बाब म्हणजे कुपोषित बालके बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण (९१.३० टक्के) एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कोरोना काळात राहिले आहे.
.....................
कोट :
जिल्ह्यात कुपोषणमुक्तीसाठी प्रशासनाकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. मुले सुदृढ राहावी, यासाठी मातांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे. त्यामुळेच तीन वर्षांत ४५७ बालकांना पूर्णत: बरे करण्यात यश मिळाले असून यापुढेही कुपोषणमुक्तीच्या कार्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल.
- संजय जोल्हे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास, जि.प., वाशिम