‘सारी’, ‘आयएलआय’ची लक्षणे असलेल्या चौघांवर उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 03:33 PM2020-05-17T15:33:45+5:302020-05-17T15:33:51+5:30
तीघांमध्ये ‘सारी’ची; तर एकात ‘आयएलआय’ची लक्षणे आढळली असून संबंधित चौघांवरही उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यभरात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाला असताना तुर्तास तरी वाशिम जिल्ह्याची स्थिती सुदैवाने चांगली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०८ ‘थ्रोट स्वॅब’ नमुन्यांपैकी ९८ अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यातील चार अहवाल रविवार, १७ मे रोजी प्राप्त झाले. त्यातील तीघांमध्ये ‘सारी’ची; तर एकात ‘आयएलआय’ची लक्षणे आढळली असून संबंधित चौघांवरही उपचार सुरू आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यातील गावांमध्ये शिरकाव होऊ नये, यासाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्यानुषंगाने विविध स्वरूपातील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातून आजपर्यंत १०८ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी तीन अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले. त्यातील एकाचा मृत्यू झाला; तर दोघांवर उपचार करून अंतीम अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अप्राप्त ११ अहवालांपैकी ४ अहवाल १७ मे रोजी प्राप्त झाले. त्यातील तीघांमध्ये ‘सारी’ची; तर एकात ‘आयएलआय’ची लक्षणे आढळून आली आहेत. ‘सारी’ची लक्षणे असलेल्या दोन व्यक्तींवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच उर्वरित दोघांवर वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहेत. प्रयोगशाळेकडून अप्राप्त ७ अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येतात की ‘निगेटिव्ह’, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.