सफाई कामगाराकडून रुग्णावर उपचार; तीन जण सेवेतून बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 04:44 PM2020-01-28T16:44:07+5:302020-01-28T16:44:30+5:30
याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना सेवेतून बडतर्फ केले आहे तर अजून दोन परिचारिकांची चौकशी लावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात सफाई कामगाराने रूग्णावर उपचार केल्याचे प्रकरण चांगलेच गाजत असून, याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना सेवेतून बडतर्फ केले आहे. तर अजून दोन परिचारिकांची चौकशी लावली आहे.
गोरगरीब रुग्णांना मोफत तसेच माफक दरात उपचार मिळावे याकरीता सरकारी रुग्णालयांची उभारणी करण्यात आली आहे. वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालय असून जिल्हाभरातील गोरगरीब रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. रुग्णांच्या गैरसोयीवरून जिल्हा सामान्य रुग्णालय नेहमीच चर्चेत असते. आता सफाई कामगाराने रुग्णावर उपचार केल्याच्या गंभीर प्रकारामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय चांगलेच प्रकाशझोतात आले आहे. २५ व २६ जानेवारी दरम्यान एक महिला प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. दुसºया दिवशी या महिलेला एका सफाई कामगार महिलेने इंजेक्शन दिल्याची ‘चित्रफित’ सोशल मीडियावर व्हायरल झाली. सफाई कामगार महिलेला विरोध केल्यानंतरही तिने इंजेक्शन दिल्याची प्रतिक्रिया संबंधित रुग्ण महिलेने दिली. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी संबंधित सफाई कामगार महिलेला सेवेतून बडतर्फ केले तसेच त्या वार्डाची जबाबदारी सांभाळणाºया दोन परिचारिकेला सेवेतून कमी करण्याची कारवाई केली. संबंधित वार्डच्या पर्यवेक्षिका म्हणून जबाबदारी सांभाळणाºया अन्य दोन परिचारिकेलादेखील नोटीस बजावण्यात आल्याचे डॉ. अंबादास सोनटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.