एकिकडे वृक्षलागवडीसाठी आटापिटा; दुसरीकडे वृक्षसंवर्धनाकडे कानाडोळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 03:35 PM2018-06-01T15:35:28+5:302018-06-01T15:35:28+5:30
वाशिम : वृक्ष लागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात जिल्ह्यात १३.८८ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी आढावा घेतला जात आहे तर दुसरीकडे वृक्ष संवर्धनाची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याने वृक्षतोडीवरून दिसून येते.
वाशिम : वृक्ष लागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात वाशिम जिल्ह्यात १३.८८ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी आढावा घेतला जात आहे तर दुसरीकडे वृक्ष संवर्धनाची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याने वृक्षतोडीवरून दिसून येते. वाशिम ते अनसिंग, वाशिम ते मालेगाव या मार्गावर आग लावून जवळपास २० ते २५ वृक्षांची कत्तल करण्यात आली.
पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी राज्यभरात वृक्ष लागवड मोहिम राबविली जात आहे. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. सन २०१६ आणि २०१७ मध्ये जिल्ह्यात विविध प्रजातींचे जवळपास ५ लाख वृक्ष लागवड केली होती. येत्या १ ते ३१ जुलै या कालावधीतही १३.८८ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले. कोणत्या विभागाने किती वृक्ष लागवड करावी याचे नियोजन केले असून, जबाबदारीही निश्चित केली आहे. त्यासाठी आढावाही घेतला जात आहे. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे जतन करण्यासाठी फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याने रस्त्यालगतच्या वृक्षांना आग लावून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याचे दिसून येते. वाशिम ते अनसिंग या मार्गावर आग लावून एका वृक्षाची कत्तल केल्याची बाब ३० मे रोजी उघडकीस आली. यापूर्वी वाशिम ते मालेगाव या मार्गावरील वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. वृक्षरोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी वृक्षप्रेमींनी शुक्रवारी केली.