मोरगव्हाण तलावाच्या भिंतीवर वाढले वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:20+5:302021-06-21T04:26:20+5:30
मोरगव्हाण सिंचन तलावात यंदा उन्हाळ्यात ४० टक्के जलसाठा शिल्लक होता. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या धुवाधार पावसामुळे तलावाची पाणीपातळी आणखी ...
मोरगव्हाण सिंचन तलावात यंदा उन्हाळ्यात ४० टक्के जलसाठा शिल्लक होता. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या धुवाधार पावसामुळे तलावाची पाणीपातळी आणखी वाढलेली आहे. दुसरीकडे मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करीत असताना संबंधित यंत्रणेने धरणाच्या भिंतीवर उगवलेली झाडे तोडण्याकडे लक्ष दिले नाही आणि आता ते शक्यदेखिल नाही. तलावाच्या भिंतीवर वाढलेल्या वृक्षांची गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कटाई झालेली नाही. या झाडांमध्ये रानडुकरे दडून बसत आहेत. तसेच खरीप हंगामात पेरलेल्या बियाण्यांची नासधूस करीत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून संबंधित यंत्रणेने ही समस्या निकाली काढण्याची मागणी होत आहे.
.......................
रानडुकरांच्या हल्ल्याची भीती
मोरगव्हाण सिंचन तलावाच्या भिंतीवरील वाढलेल्या घनदाट वृक्षांमध्ये रानडुकरांचे कळप वास्तव्यास आहेत. ते कधीही हल्ला करू शकतात. त्यामुळे या भागात शेती असलेल्या शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.