स्त्यालगतच्या झाडांना दिले जातेय पेटवून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 02:54 PM2019-04-19T14:54:18+5:302019-04-19T14:54:58+5:30
वाशिम : उन्हाळ्याला सुरूवात होताच रस्त्यालगतच्या झाडांना पेटवून देण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उन्हाळ्याला सुरूवात होताच रस्त्यालगतच्या झाडांना पेटवून देण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. १८ एप्रिल रोजी सायंकाळी वाशिम ते हिंगोली मार्गावरील सुरकंडी फाटा येथील एका मोठ्या झाडाला अशीच आग लागली होती. वाशिम येथील अग्निशमन विभागाच्या चमूने वेळीच घटनास्थळ गाठून ही आग विझविली.
एकीकडे वृक्षलागवड अभियानाबाबत जनजागृती केली जाते तर दुसरीकडे रस्त्यालगतची झाडे जाळण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. दिवसेंदिवस झाडाची संख्या झपाटयाने कमी होत असतांना शासनाच्यावतीने वृक्षरोपण व संगोपनाबाबत सर्वस्तरावर जनजागृती केल्या जाते. वाशिम जिल्हयातही वृक्ष लागवड मोहीम यापूर्वी राबविण्यात आली तसेच आगामी जुलै महिन्यात ही मोहिम व्यापक प्रमाणात राबविली जाणार आहे. त्यानुषंगाने वन व सामाजिक वनीकरण विभागाने यापूर्वी आढावा बैठकही घेतली आहे. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांची कटाई होत असल्याचेही चित्र आहे. रस्त्यालगतच्या झाडांना आग लावण्याचा प्रकार होत असतांना याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. वृक्षांची तस्करी करणारे काही इसम झाडांच्या बुध्यांना आग लावून तर काही शेतकरी वणवा पेटून देतांना झाडांना याची बाधा होईल, याची जाणीवही ठेवत नसल्याने वृक्षांना आग लागत आहे. १८ एप्रिल रोजी वाशिम शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुरकंडी फाटा येथील एका मोठ्या वृक्षाला आग लागली होती. याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळ गाठून सदर आग विझविली.