बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकरीच बनविणार ‘ट्रायकोकार्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:51 PM2018-08-25T13:51:59+5:302018-08-25T13:53:42+5:30
मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड असलेल्या गावांतील शेतकºयांना या किडीवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गतवर्षापासून बोंडअळीच्या प्रकोपामुळे शेतकरी धास्तावला असून, या कारणामुळे पुढील काळात कपाशीच्या क्षेत्रात मोठी घट येण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने ‘ट्रायकोकार्ड’ वापराची योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड असलेल्या गावांतील शेतकºयांना या किडीवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेतकरी या प्रशिक्षणानंतर ट्रायकोकार्डची निर्मिती करू शकणार आहेत.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वाशिम द्वारा जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचाºयांचें चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा वाशिम दत्तात्रय गावसाने यांनी शेतकºयांना ट्रायकोकार्ड बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आत्माच्यावतीने राज्यांतर्गत शेतकºयांना ट्रायकोकार्ड बनविण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योजक बनविले जाणार आहे. विशेषकरून बोंडअळी नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड असलेल्या गावांमधील इच्छुक शेतकºयांची या प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. यासाठी इच्छुक शेतकºयांना २९ आॅगस्ट रोजी प्रकल्प संचालक आत्मा वाशिम कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स व सातबाराची झेरॉक्स वैयक्तिक शैक्षणिक माहितीसह उपस्थित राहावे लागणार आहे. उपस्थित असलेल्या शेतकºयांची निवड प्रशिक्षणासाठी करण्यात येईल.
मित्रकिटकापासून (ट्रायकोग्रामा) तयार होणार ट्रायकोकार्ड
ट्रायकोग्रामा हा सूक्ष्म कीटक असून अंडी, अळी, कोष आणि पतंग या ४ अवस्थांमध्ये त्याचा जीवनक्रम पूर्ण होतो. अंडी, अळी आणि कोष या तीनही अवस्था यजमान किडींच्या अंड्यातच पूर्ण होतात. कोषातून बाहेर पडलेला प्रौढ ट्रायकोग्रामा हा सुद्धा अतिशय सूक्ष्म असून, एका टाचणीच्या टोकावर ८ -१० प्रौढ ट्रायकोग्रामा राहू शकतात. प्रौढ ट्रायकोग्रामा २४ ते २८ तास जगतो. हे किटक तयार करण्यासाठी शेतकºयांना प्रयोगशाळेतून कार्डर्स दिल्या जाणार असून, हे कार्ड दोन दिवसाच्या आत शेतात वापरणे आवश्यक आहे. हे कार्ड पोस्टकार्ड सारखे असून, एका कार्डवर ट्रायकोग्रामा या मित्रा किटकाची १८,००० ते २०,००० अंडी असतात. या कार्डचे कात्रीने सहा तुकडे करून ते स्टेपलरने पानाच्या खाली अडकवावे लागणार आहे. याबाबत आत्माच्यावतीने तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.