बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न - संजय जोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 06:48 PM2020-09-26T18:48:34+5:302020-09-26T18:49:03+5:30
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रातील कामकाज प्रभावित होत आहे. यामधून अंगणवाडी केंद्रही सुटू शकले नाहीत. अंगणवाडी केंद्र बंद असल्याने बालकांचा पोषण आहार, ‘पोषण माह’ या उपक्रमात आरोग्यविषयक जनजागृती, अतितिव्र गटातील कुपोषित बालके, अंगणवाडी केंद्रातील कामकाज आदीसंदर्भात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद. बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात किती कुपोषित बालके आहेत आणि त्यांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना आहेत?
जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, अतितिव्र कुपोषित गटात जवळपास ९६ बालके आहेत. या बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी विशेष पोषण आहार पुरविण्यात येतो. पोषण माह या उपक्रमात कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यांची नियमित आरोग्य तपासणी करून दोन महिन्यापर्यंत या बालकांवर विशेष लक्ष ठेवून ते कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर कसे पडतील, याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘पोषण माह’निमित्त कोणत्या उपक्रमावर भर देण्यात येत आहे?
पोषण माहनिमित्त कोणते कार्यक्रम, उपक्रम कोणत्या दिवशी घ्यावे, याचे निश्चित वेळापत्रक तयार करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून आरोग्य विषयक जनजागृती केली जात आहे. बालकांच्या बौद्धिक, शारीरिक व व्यक्तिमत्व विकासासाठी कोणते घटक महत्वपूर्ण आहेत, पालकांची कोणती दक्षता घ्यावी याबाबत माहिती देण्यात येत आहे.
पोषण आहार प्रत्येक बालकापर्यंत पोहचत नाही, असे म्हटले जाते. याबाबत आपण काय सांगाल?
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या पुढील आदेशापर्यंत अंगणवाडीतील शिक्षण प्रक्रिया सध्या बंद आहे. त्यामुळे बालकांना पोषण आहारासाठी दोन महिन्याचे धान्य घरपोच किंवा अंगणवाडी केंद्रात दिले जाते. सर्वच बालकांना पोषण आहारासाठी प्रस्तावित व नियोजित अन्नधान्याचे वाटप करण्यात येते.
सध्या अंगणवाडी केंद्रातील कामकाज कसे सुरू आहे?
कोरोनामुळे सध्या अंगणवाडी शिक्षण पद्धती बंद आहे. परंतू, आवश्यक ती खबरदारी घेऊन बालकांचे वजन, मोजमाप घेणे, पोषण आहार, आरोग्यविषयक जनजागृती आदी उपक्रम सुरू आहेत.
पोषण माहनिमित्त वैयक्तिक स्वच्छता, स्तनदा माता व कुपोषित बालकांच्या मातांची सभा घेऊन मार्गदर्शन करणे, अंगणवाडी केंद्रांतर्गत येणाºया सर्व गर्भवती, ० ते ६ वर्र्षे वयोगटातील बालकांची वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांमार्फत वजन व उंचीचे मोजमाप, पोषण घटकांची कमतरता आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून जनजागृती सुरू आहे. माता, पालकांनीदेखील आरोग्याची काळजी घ्यावी.