‘मआविम’च्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:42 AM2021-02-09T04:42:33+5:302021-02-09T04:42:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : बचत गटातील महिला या उद्योजक व्हाव्यात, यासाठी नवतेजस्विनी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. बचत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बचत गटातील महिला या उद्योजक व्हाव्यात, यासाठी नवतेजस्विनी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. बचत गटातून केवळ महिला सक्षम न होता, आता बचतगट सक्षम झाले पाहिजेत. महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असून, या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मआविम) अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी शनिवारी येथे केले.
वाशिम येथील महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय येथे आयोजित सभेत ठाकरे बोलत होत्या. यावेळी आमदार अॅड. किरणराव सरनाईक, ‘मआविम’चे विभागीय सनियंत्रण अधिकारी केशव पवार, मंगला सरनाईक, जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे उपस्थित होते. लोकप्रतिनिधींना ‘मआविम’च्या कार्याची माहिती बचत गटातील महिलांनी व सहयोगिनी यांनी द्यावी. बचत गटातील महिलांनी केलेल्या कामामुुळे ‘मआविम’चे नाव उंचावले आहे. स्वस्त धान्य दुकानाचे वाटप करताना, ज्या दुकानदाराकडे चार दुकाने जोडली आहेत, अशी दुकाने प्राधान्याने बचत गटांना द्यावी, अशा सूचनाही ठाकरे यांनी दिल्या. मआविम ही राज्यातील महिलांची शिखर संस्था आहे तसेच मआविम हे साडेसोळा लाख महिलांचे कुटुंब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अॅड. किरणराव सरनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यालयाच्या परिसरात बचत गटातील महिलांनी विक्रीसाठी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष ठाकरे, आमदार सरनाईक यांनी बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन साहित्य निर्मिती व विक्री याबाबतची माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाला लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष, व्यवस्थापक व कर्मचारी तसेच सहयोगिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांनी केले. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सहाय्यक सनियंत्रण अधिकारी कल्पना लोहकपुरे यांनी मानले.
बॉक्स
कोविड योद्ध्यांचा सत्कार
कोविड योद्धा म्हणून साईराम महिला बचत गटासह वेदश्री, विशाखा, वैभव, माऊली, अनुसया, रमाई व ओम शांती या महिला बचत गटांना प्रमाणपत्र देऊन ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच जानेवारी २०२१मध्ये आयसीआयसीआय बँकेने जिल्ह्यातील बचत गटांसाठी मंजूर केलेल्या दोन कोटी २० लाख पाच हजार ४०० रुपयांचा धनादेश ज्योती ठाकरे आणि आयसीआयसीआय बँकेचे शिंदे यांनी लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला.