अंगावर खाजकुयरी टाकून लुटण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 7, 2014 01:15 AM2014-06-07T01:15:42+5:302014-06-07T01:16:18+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे अंगावर खाजकुयरी टाकून लुटण्याचा प्रयत्न
मंगरूळपीर : तालुक्यातील शेलूबाजार येथील मुख्य चौकात एका शेतकर्याच्या अंगावर खाजकुयरी टाकून हातातील ४0 हजार रुपयांच्या रकमेची थैली ओढून पळणार्या अज्ञात चोरट्याचा अाँटोचालक दीपक डोंगरे यांनी पाठलाग करून पैशाची थैली हस्तगत केली. त्यांनी ती रक्कम शेतकर्याला परत केली. ही घटना ५ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
किन्हीराजा येथील माजी मुख्याध्यापक चंद्रकांत काटे यांनी ५ जूनला शेलूबाजार येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून ४0 हजार रुपये काढले. ते पैसे स्टेट बँकेतील त्यांच्या मुलाच्या खात्यात ते जमा करणार होते; परंतु शेलूबाजार येथील स्टेट बँकेचे व्यवहार गुरुवारी बंद असतात. त्यामुळे त्या पैशांची थैली घेऊन ते गावी जाण्यासाठी मुख्य चौकात येत असताना एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या अंगावर खाजकुयरी टाकून पैशाची थैली ओढून पळ काढला होता.
काटे हे त्याचा पाठलाग करीत असल्याचे पाहून ऑटोचालक दीपक डोंगरे यांनी त्या चोरट्याचा पाठलाग केला असता चोरट्याने पैशांची थैली फेकून तो पळून गेला. डोंगरेने ती थैली काटे यांना प्रामाणिकपणे दिली. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.