तुरीच्या चुकाऱ्यांचे १४ कोटी रुपये थकीत!

By admin | Published: June 15, 2017 01:54 AM2017-06-15T01:54:48+5:302017-06-15T01:54:48+5:30

शेतकरी संकटात : रोख रक्कम हाती नसल्याने खरीप वांध्यात

Tuki puke 14 million rupees tired! | तुरीच्या चुकाऱ्यांचे १४ कोटी रुपये थकीत!

तुरीच्या चुकाऱ्यांचे १४ कोटी रुपये थकीत!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘नाफेड’ने केलेल्या तूर खरेदीचे १४ कोटी ४४ लाख रुपयांचे चुकारे अद्याप प्रलंबित आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे यातील २.७६ कोटी रुपयांची रक्कम २६ मे पर्यंतची असून उर्वरित ११.६८ कोटी रुपयांची रक्कम २७ मे ते ३ जून या कालावधीमधील आहे. तथापि, तूर विकूनही शासनाकडे अडकलेला पैसा आणि चलन तुटवड्यामुळे खरीप पीक कर्जाची रक्कम हाती पडणे दुरापास्त झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यात ‘नाफेड’कडून हमीभावाने झालेली तूर खरेदी सुरुवातीपासूनच या-ना-त्या कारणांनी टिकेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. साधारणत: फेब्रुवारी २०१७ पासून ‘नाफेड’ने जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव या पाच केंद्रांमार्फत तूर खरेदी केली. तेव्हापासून २६ मे पर्यंत ६२.११ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करावयाचे होते. त्यापैकी ५९.३५ कोटी रुपये अदा करण्यात आले; तर २.७६ कोटी रुपये प्रलंबित ठेवण्यात आले. २६ मे पासून ३ जूनपर्यंत करण्यात आलेल्या तूर खरेदीपोटी शेतकऱ्यांना ११.६८ कोटी रुपये अद्याप मिळायचे बाकी आहेत. त्यामुळे विविध स्वरूपातील अडचणींचा सामना करीत ‘नाफेड’च्या केंद्रांवर तूर विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे. ज्या खरीप हंगामासाठी तूर विकली, त्यासाठीदेखील वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी पुरते वैतागले असून, शासनाने अंगीकारलेल्या धोरणाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टोकन मिळालेले शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत
३१ मे पर्यंत जिल्ह्यातील १७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना ‘टोकन’ देण्यात आले; मात्र १० जूनपासून अचानकपणे तूर खरेदी बंद करण्यात आल्याने ४.८३ लाख क्विंटल तूर घरात पडून आहे. तथापि, ज्यांनी तूर विकली, त्यांना पैसे मिळाले नाहीत आणि ज्यांना ‘टोकन’ मिळाले, त्यांची तूर खरेदी झाली नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

तुरीच्या प्रलंबित असलेल्या चुकाऱ्यांबाबत नाफेडच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली असता, २७ मे ते ३ जून पर्यंत करण्यात आलेल्या तुरीच्या चुकाऱ्याची रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ही रक्कम चुकारे अदा करण्यासाठी नेमलेल्या संस्थांच्या खात्यात वळती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
- रमेश कटके,
जिल्हा सहायक निबंधक, वाशिम

Web Title: Tuki puke 14 million rupees tired!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.